ब्युरो टीम: महाराष्ट्र विधानसभेच्या 166 अंधेरी पूर्व' मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या या मतदान प्रक्रियेत सुमारे 31.74 टक्के मतदान झाले असून सर्व प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी आज दिली.
अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व 256 मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजतापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीस म्हणजे सकाळी 11 वाजेपर्यंत 9.72 टक्के मतदानाची टक्केवारी होती. दुपारी 1 वाजेपर्यंत 16.89 टक्के मतदान झाले. तर दुपारी 3 वाजेपर्यंत 22.85 टक्के; सायंकाळी 5 वाजेपर्यंत 28.77 टक्के मतदान झाले. तर मतदान प्रक्रियेच्या अखेरीस अर्थात मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मतदारसंघात सुमारे 31.74 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पाटील यांनी दिली.
या २५६ मतदान केंद्रांपैकी मरोळ एज्युकेशन अकादमी हायस्कूल येथे मतदान केंद्र क्रमांक 53 मध्ये सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. या मतदान केंद्रांमध्ये एकूण 1 हजार 418 मतदारांमध्ये 726 महिला मतदार असल्याने आणि महिला मतदारांची ही संख्या अंधेरी पूर्व मतदारसंघात सर्वाधिक असल्याने या ठिकाणीच सखी मतदान केंद्र तयार करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.पाटील यांनी सांगितले.
आजच्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने मतमोजणी ही रविवार दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 8 वाजता पासून सुरू होणार आहे, अशीही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा