जगभरातील सर्वोत्तम, दर्जेदार चित्रपट आणि अशा चित्रपटांची निर्मिती करणारे सृजनशील कलावंत यांची मांदियाळी पुन्हा एकदा जमवत, 53 व्या इफ्फी म्हणजे, आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाची 20 नोव्हेंबर 2022 रोजी गोव्यात, पणजी इथल्या, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोर स्टेडियम मध्ये शानदार सुरुवात झाली. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि गोव्याच्या एन्टरटेरमेंट सोसायटीने संयुक्तरित्या या महोत्सवाचे आयोजन केले आहे. ह्या लोकप्रिय महोत्सवात, यंदा जगभरातील, 79 देशातील 280 चित्रपट दाखवले जाणार आहेत.
नऊ दिवस चालणार्या चित्रपट महोत्सवाची केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी दीपप्रज्वलन करत या महोत्सवाची सुरुवात केली. भारताला, चित्रीकरण आणि चित्रपट निर्मितीनंतरच्या प्रक्रियांचे जगभरातले सर्वात पसंतीचे केंद्र बनवण्याचा आपला प्रयत्न आहे, असं सांगत, त्यासाठी, भारतातील कलाकारांची गुणवत्ता आणि या उद्योगक्षेत्रातील धुरीणाचे अभिनव कौशल्य उपयुक्त ठरेल, असे अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले. “इफ्फी हा केवळ काही दिवसांचा महोत्सव म्हणून मर्यादित राहू नये, अशी माझी अपेक्षा आहे. ज्यावेळी आपण स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करु, या अमृतमहोत्सपासून सुरु झालेल्या अमृत काळाच्या 25 वर्षांत इफ्फी सुरु राहावा, अशी आमची दृष्टी आहे. भारताला सिनेमा आशयनिर्मितीचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी, विशेषतः देशातील प्रादेशिक सिनेमातील आशय निर्मिती अधिक संपन्न करण्यासाठी, प्रादेशिक महोत्सवाची व्याप्ती वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.” असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
भारतातील, विविधरंगी संस्कृतींचा आणि चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकृतींचा एकजिनसी संगम होण्यासाठी 53 वे इफ्फी सज्ज झाले आहे, असे अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले. “भारतीय सिनेमात भारताच्या समृद्ध संस्कृतींचे, परंपरा, वारसा, आशा-आकांक्षा आणि स्वप्ने, महत्वाकांक्षा तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे, प्रत्येक काळात जागी असणारी जनतेची सदसद्विवेकबुद्धी अशा सर्वांचे केवळ प्रतिबिंब असते असे नाही, तर, त्याला नवे पैलू पाडून त्यांचं अत्यंत देखणे रूप सिनेमातून मांडले जाते.” असे देखील ठाकूर यांनी नमूद केले.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये मंत्रमुग्ध झालेल्या प्रेक्षकांना संबोधित करताना, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्यात जागतिक दर्जाचे मल्टिप्लेक्स आणि कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे आणि 2025 मधील इफ्फी आपण नवीन ठिकाणी साजरा करू, अशी आशा आहे.
महोत्सवामध्ये स्थानिक अभिरुचीची जोड देण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख करून प्रमोद सावंत म्हणाले की, यंदाच्या इफ्फीमध्ये राज्य सरकारने गोव्यातील चित्रपट कलाकारांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यामध्ये हिंदी आणि मराठी चित्रपट चित्रपट क्षेत्रातील नामवंत कलाकार सहभागी होतील. “या वर्षी गोवन विभाग देखील विशेष तयार करण्यात आला आहे. यासाठी इंडियन पॅनोरमाच्या निवड समितीच्या तीन सदस्यांचा समावेश असलेल्या विशेष निवड समितीने सहा लघुपट आणि एक माहितीपट निवडला आहे. फेस्टिवल माईल, एनटरटेनमेंट झोन आणि हेरिटेज परेड यांसारख्या बहुविविध उपक्रमांद्वारे आम्ही पर्यटकांचे आणि गोव्यातील जनतेचे लक्ष वेधण्यात यशस्वी झालो आहोत”, ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की संपूर्ण गोव्यात कॅराव्हॅन तैनात केले जातील आणि लोकांसाठी स्क्रीनिंग आयोजित केले जाईल. महोत्सव आणखी सर्वसमावेशक व्हावा, यासाठी दिव्यांगजनांसाठी चित्रपटांचे विशेष खेळ देखील आयोजित करण्यात आले आहेत, प्रमोद सावंत यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे स्मरण देखील केले, ज्यांच्या प्रयत्नांमुळे गोवा हे इफ्फी महोत्सवाचे कायम स्वरूपी आयोजन स्थळ बनले.
टिप्पणी पोस्ट करा