राज्यातील पोलीस स्टेशन आणि पोलीस निवासस्थानांची कामे ही प्राथमिकता असून ती कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाला दिले आहेत. या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस गृहनिर्माण संदर्भात महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. अपर मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, बृहन्मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, सुरुवातीच्या टप्प्यात अत्यावश्यक असलेली कामे हाती घ्या. ती वेळेवर आणि गतीने पूर्ण होतील, यासाठी प्राधान्य द्या. पोलीस स्टेशनच्या ठिकाणीच पोलीस निवासस्थानांसाठी जागा उपलब्ध असेल तर तिथेच ती बांधली जावीत. त्या जागेचा पुरेपूर उपयोग पोलिसांसाठी होईल, अशा पद्धतीने आराखडा तयार करण्याची सूचना त्यांनी केली. पोलिसांच्या निवासस्थान बांधकामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशन बांधकामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही निधी देण्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
टिप्पणी पोस्ट करा