राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत धक्काबुक्की, जमिनीवर पडले दिग्विजय सिंह

 


काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी सध्या कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेवर आहेत. मध्य प्रदेशातील या पदयात्रेचा आज चौथा दिवस आहे. यानंतर राहुल आपल्या टीमसह राजस्थानमध्ये दाखल होणार आहेत, तिथे अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील राजकीय लढाई चव्हाट्यावर आली आहे.

राहुल गांधींची यात्रा आज ओंकारेश्वर ते इंदूरकडे निघाली असताना चहापानाच्या वेळी धक्काबुक्की झाली. यादरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह पडले, तेथे उपस्थित समर्थक आणि सुरक्षा दलांनी त्यांना सावरले यानंतर दिग्विजय उठले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अपघातात दिग्विजय सिंह यांना गंभीर दुखापत झालेली नाही. त्यांची तब्येत बरी असून ते यात्रेत पुढे जात आहेत, दिग्विजय सिंग देखील आज राहुल गांधींसोबत पायी चालताना दिसत आहेत.

बरवाहपासून चार किमी अंतरावर चोर बावडीजवळ एका हॉटेलमध्ये राहुल गांधी अचानक चहासाठी थांबले. त्यावेळी तेथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे दिग्विजय सिंह जमिनीवर कोसळले. या संपूर्ण प्रकरणावर दिग्विजय सिंह यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आज राहुल गांधींची ही यात्रा खरगोन जिल्ह्यातील मनिहार, बलवाडा मार्गे महूला पोहोचेल. 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला राहुल भेट देणार आहेत. यानंतर ते एका सभेला संबोधितही करतील. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री कमलनाथ, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह देशातील आणि राज्यातील सुमारे 40 नेते उपस्थित राहणार आहेत. आज त्यांच्या भेटीत त्यांची बहीण प्रियांका गांधी दिसल्या नाहीत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्या दिल्लीला परतल्या  आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने