चेन्नई राष्ट्रीय महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, हा प्रकल्प जिल्ह्यातील चार तालुक्यातून जाणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग व्यवसाय निर्माण होऊन जिल्ह्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. यासाठी लवकरात लवकर भूसंपादन करावे, अशा सूचना महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे दिल्या.
नियोजन भवन सोलापूर येथे सूरत - चेन्नई राष्ट्रीय महामार्ग व शहरातील उड्डाणपूलासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी व रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत आणि सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण शिरीष सरदेशपांडे, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, सूरत - चेन्नई महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमीन संपादनाबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. शेत पिकांसाठी भूमिगत वाहिनी काढण्याबाबतचे अंतर कमी राहील, याची दक्षता घ्यावी. सोलापूर शहरातील दोन उड्डाणपूलांसंदर्भात शासकीय जागांबाबत तात्काळ मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील 18 गावे, उत्तर सोलापुर तालुक्यातील 8 गावे, दक्षिण सोलापुरातील 16 गावे व अक्कलकोट तालुक्यातील 17 अशा एकूण 59 गावांतील भूसंपादन करण्यात येणार आहे. मोजणीसाठी प्रत्येक तालुक्यासाठी एक अशी विविध विभागांची चार पथके तयार करून रोव्हरच्या साह्याने मोजणी करण्यात आली आहे. तसेच या पथकामार्फत जाग्यावरच शेतकऱ्यासमक्ष पंचनामे देखील करण्यात आले आहेत. सूरत- चेन्नई भूसंपादनाचे सर्व काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोलापूर शहरातील जुना पुना नाका ते पत्रकार भवन चौक व जुना बोरमणी नाका ते मोरारका बंगलापर्यंत दोन उड्डाणपूल होणार असून, हे दोन उड्डाणपूल 10.450 किमी लांबीचे आहेत. या अंतर्गत येणाऱ्या 11 शासकीय विभागांच्या जागा तात्काळ मिळाव्यात, यासाठी शासनस्तरावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी यावेळी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा