पीपीएफ अकाउंटवर कसे व किती व्याजदराने मिळते कर्ज

 


भविष्य निर्वाह निधी (पीएफ) गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानला जातो. तुम्ही नोकरी करत असाल, आणि तुमचं पीएफ अकाउंट असेल, तर तुम्हाला माहिती आहे का, पीएफ अकाउंटवर तुम्हाला कर्जाची सुविधाही मिळते. गरज भासल्यास तुम्ही पीपीएफ अकाउंटमधूनच कर्ज घेऊ शकता. पैशाची गरज असेल तेव्हा अनेकजण पर्सनल लोन अर्थात वैयक्तिक कर्ज घेण्यास प्राधान्य देतात. अशावेळी काहीजण फिक्स डिपॉझिटवर कर्ज घेतात. मात्र, तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ मध्ये गुंतवणूक केली, तर तुम्ही पीपीएफ अकाउंटवर कर्ज घेऊ शकता.

पीपीएफ ही योजना जोखीममुक्त असल्यानं ती गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तसेच ती ट्रिपल टॅक्स बेनिफिट म्हणजे पैसे जमा करणे, व्याज आणि पैसे काढणे, या तिन्हींवर टॅक्समध्ये सूट देते. हे या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. ज्या आर्थिक वर्षात तुम्ही पीपीएफ अकाउंट उघडलं असेल, ते आर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढील पाचवे आर्थिक वर्ष संपेपर्यंत या अकाउंटमधून कर्ज घेण्यास तुम्ही पात्र आहात. म्हणजेच, जर तुम्ही जानेवारी 2022 मध्ये पीपीएफ अकाउंट उघडले असेल, तर तुम्ही 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2028 पर्यंत कर्ज घेऊ शकता.

तुम्ही ज्या आर्थिक वर्षात कर्जासाठी अर्ज करत आहात, त्या आर्थिक वर्षाच्या अगोदरच्या दुसऱ्या आर्थिक वर्षाच्या शेवटी तुम्ही पीपीएफ अकाउंटमध्ये शिल्लक असणाऱ्या रकमेच्या 25 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला मार्च 2022 मध्ये कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्ही 31 मार्च 2020 रोजी तुमच्या पीपीएफ अकाउंटमध्ये शिल्लक असणाऱ्या रकमेच्या 25 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकता. मात्र, तुम्हाला एका आर्थिक वर्षात एकदाच कर्ज घेता येईल, व जुने कर्ज फेडल्यानंतरच नवीन कर्ज घेता येईल.

तुम्ही कर्ज घेतलेल्या महिन्याच्या सुरुवातीपासून 36 महिन्यांच्या आत तुम्हाला कर्जाची मूळ रक्कम (Principal Amount) एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये परत करावी लागेल. मूळ रक्कम भरल्यानंतर,  तुम्ही जास्तीत जास्त दोन मासिक हप्त्यांमध्ये व्याजाची रक्कम देऊ शकता. नियमानुसार, तुम्हाला पीपीएफ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या व्याजापेक्षा एक टक्का जास्त व्याज तुम्ही या अकाउंटमधून कर्ज घेतेलेल्या रक्कमेवर द्यावं लागतं. सध्या पीपीएफ गुंतवणुकीवर 7.1 टक्के व्याज मिळते. म्हणजे जर तुम्ही आता कर्ज घेतलं, तर तुम्हाला या कर्जावर द्यावा लागणारा व्याजदर 8.1 टक्के असेल.

मात्र, जर तुम्ही 36 महिन्यांच्या आत कर्जाची पूर्ण किंवा काही प्रमाणात रक्कम परत केली नाही,  तर थकीत कर्जाच्या रकमेवर 6 टक्के जास्त दरानं व्याज आकारलं जाईल. याचा अर्थ असा की, तुम्हाला पीपीएफ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या व्याजापेक्षा 6 टक्के अधिक व्याज (म्हणजेच सध्याचे 7.1 टक्के + 6 टक्के = 13.1 टक्के) द्यावं लागेल. कारण तुम्हाला कर्जाच्या रकमेवर व्याज मिळत नाही. ही व्याजाची रक्कम प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी तुमच्या पीपीएफ अकाउंटमधून कापली जाईल. तसेच, तुम्ही कर्जाची रक्कम म्हणजेच मुद्दल निर्धारित वेळेत भरली असेल, परंतु त्यावरील व्याज निर्धारित वेळेत भरले नाही, तर ती व्याजाची रक्कम सुद्धा तुमच्या पीपीएफ अकाउंटमधून कापली जाईल.

 दरम्यान, 'पीपीएफ'वर कर्ज घेण्याची सुविधा असून इतर पर्सनल लोन घेण्यापेक्षा हा पर्याय ग्राहकांसाठी चांगला ठरू शकतो. कारण पीपीएफ अकाउंटवर ज्या व्याज दराने कर्ज मिळते, तो दर इतर बहुतांश पर्सनल लोनवर द्याव्या लागणाऱ्या व्याजापेक्षा कमी असल्यानं हे फायदेशीर आहे.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने