भारत जोडो यात्रेपूर्वी राजस्थान काँग्रेसमधील संकट गडद

 


राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपूर्वी राजस्थान काँग्रेसमधील संकट अधिकच गडद झाले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सध्या जुगलबंदी पाहायला मिळत आहे. सीएम गेहलोत यांनी काल एका टीव्ही मुलाखतीत पायलटला देशद्रोही म्हटले होते याला पायलट यांनी देखील प्रत्युत्तर दिले. अशा स्थितीत राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रेच्या वेळी राहुल गांधींसमोर पक्षाची एकजूट दाखविण्याचे मोठे आव्हान राजस्थान काँग्रेस समोर असणार आहे.

राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' मध्य प्रदेशात 380 किलोमीटरचे अंतर कापून 4 डिसेंबरला राजस्थानमध्ये प्रवेश करेल. पायलट गुरुवारी शेजारच्या मध्य प्रदेशातील यात्रेत सामील झाले. काँग्रेसशासित राजस्थानमध्ये नेतृत्व बदलाची मागणी भारत जोडो राज्यात पोहोचण्यापूर्वी पुन्हा जोर धरू लागली. राज्यात माजी उपमुख्यमंत्र्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.

दोन्ही दिग्गज नेत्यांमधील वाढता वाद पाहता पक्षातील जयराम रमेश यांनी मतभेद मिटवणार असल्याचे सांगितले. गेहलोत यांच्या आरोपांवर सचिन पायलट म्हणाले की, 'हे सर्व आरोप निराधार आहेत. गेहलोत यांनी मला निरुपयोगी म्हटले आहे, मला देशद्रोही म्हटले आहे.' ते म्हणाले, 'अशोक गेहलोत हे अनुभवी नेते आहेत, त्यांनी अशी बालिश विधाने करू नयेत.' माजी उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 'अशोक गेहलोत यांच्या कार्यकाळात पक्षाचा दोनदा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांनी इतके असुरक्षित वाटून घेऊ नये आणि एकत्र काम करावे'.

दुसरीकडे, अशोक गेहलोत यांच्या सचिन पायलटविरोधातील वक्तव्यावर काँग्रेसची अधिकृत प्रतिक्रियाही आली आहे. काँग्रेसने अप्रत्यक्षपणे गेहलोत यांना सल्ला देत राजस्थानबाबतचा निर्णय प्रलंबित असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसचे खासदार जयराम रमेश म्हणाले की, अशोक गेहलोत हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांचे सहकारी सचिन पायलट यांच्याशी त्यांनी जे काही मतभेद आहेत, ते अश्या पद्धतीने सोडविले जातील ज्याने काँग्रेस पक्षाला बळकटी मिळेल. सध्या उत्तर भारतात भारत जोडो यात्रेला अधिक यशस्वी करण्याची जबाबदारी सर्व काँग्रेसजनांची आहे.'

गुरुवारी भारत जोडो यात्रेतून सचिन पायलट, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांचे एकत्रित छायाचित्र समोर आले होते. सचिन पायलट यांच्या बाबतीत  गेहलोत सतत आक्रमक असतात, तर पायलटही मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडायला तयार नाहीत. विशेष म्हणजे राजस्थानचे मुख्यमंत्री राहण्यासाठी गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा दावाही सोडला होता. ते अजूनही मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाहीत.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी काँग्रेस नेते सचिन पायलटला 'देशद्रोही' ठरवत म्हटले की त्यांनी 2020 मध्ये पक्षाविरुद्ध बंड केले होते आणि राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न देखील केला, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री बनवता येणार नाही. पायलट यांच्या नेतृत्वाखाली काही काँग्रेस आमदार गुरुग्राममधील एका रिसॉर्टमध्ये महिनाभर थांबले होते, असा आरोपही गेहलोत यांनी केला. या बंडात भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांचा हात होता.


राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या 'देशद्रोही' टिप्पणीवर प्रत्युत्तर देताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांनी गुरुवारी सांगितले की, 'अशा अनुभवी व्यक्तीने अशी भाषा वापरणे योग्य नाही. यासोबतच भारतीय जनता पक्षाचा (भाजप) पराभव करण्यासाठी आणि राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी एकजुटीने लढणे याला प्राधान्य असायला हवे'. पायलट पुढे म्हणाले 'ते मला नालायक, निरुपयोगी, देशद्रोही इत्यादी म्हणत आहेत, परंतु माझे संस्कार मला अशी भाषा वापरण्याची परवानगी देत ​​​​नाही'.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने