कोळसा मंत्रालय मुंबईत गुंतवणूक संमेलन आयोजित करणार

 


पहिल्या पाच टप्प्यांमध्ये 64 कोळसा खाणींचा यशस्वी लिलाव झाल्यानंतर, कोळसा मंत्रालयाने 6 व्या फेरीच्या व्यावसायिक लिलावाअंतर्गत 133 कोळसा खाणींच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली, ज्यापैकी 71 कोळसा खाणी या नवीन कोळसा खाणी आहेत आणि 62 कोळसा खाणी पूर्वीच्याच असून नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या व्यावसायिक लिलावापैकीच आहेत. याव्यतिरिक्त, व्यावसायिक लिलावाच्या 5व्या फेरीच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत आठ कोळसा खाणी देखील सुरू करण्यात आल्या, जिथे पहिल्या फेरीत एकल बोली प्राप्त झाली.

व्यावसायिक लिलावांमध्ये तांत्रिक किंवा आर्थिक पात्रतेचे निकष नसल्याने यापूर्वी कोळसा खाण क्षेत्रात काम न केलेल्या अनेक बोलीदारानी यावेळी बोली सादर केली  आणि यशस्वी बोलीदार ठरल्याने  त्यांना कोळसा खाणी देण्यात आल्या. कोळसा खाणींच्या व्यावसायिक लिलावामध्ये अधिकाधिक बोलीदार सहभागी व्हावेत यादृष्टीने, कोळसा मंत्रालय मुंबईत 01 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणूकदार संमेलन आयोजित करणार आहे.

केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री  प्रल्हाद जोशी या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे असतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि महाराष्ट्राचे खाण मंत्री दादाजी भुसे हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कोळसा मंत्रालयाचे सचिव अमृत लाल मीना आणि खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज, हे देखील संमेलनात सहभागी होणार आहेत.

निविदा दस्तऐवजाची विक्री 03 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू झाली. खाणींचे तपशील, लिलावाच्या अटी, अवधी इत्यादी गोष्टींसाठी  मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेड ( एम एस टी सी ) हा लिलाव मंच उपलब्ध आहे. लिलाव प्रक्रिया  पारदर्शक अशा दोन टप्प्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने, महसुलातील टक्केवारीच्या आधारावर केली जाईल.

व्यावसायिक कोळसा खाणीच्या लिलावासाठी, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, ही संस्था कोळसा मंत्रालयाची  एकमेव व्यवहार सल्लागार असून लिलाव आयोजनात  कोळसा मंत्रालयाला मदत करत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने