आज श्री काळभैरव जयंती, जाणुन घ्या या देवता विषयी माहिती

 


श्री काळभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती असून, श्री काळभैरव यांच्या अधीन काळ आणि वेळ हे दोन्ही आहे. आपण ज्याला नियती संबोधतो अशी नियती हि काळवेळेच्या अधीन आहे. काळभैरव हे जगन्नियंत्या भगवान शिवाची प्रलयंकारी उजवी बाजु मानली जाते या देवाची वज्रदाढ दंत नीलवर्णीय आहे. ज्याची काया सर्वात मोठी आहे. जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे. असा हा शामवर्ण भैरव ज्यास प्रत्येक कार्यात स्मरण करुन कार्यारंभ करतात, श्री काळभैरव सदगुरुंचा दास आहे.  

श्री काळभैरव साधनेमुळे प्रकृतीगर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष, नजरदोष, ग्रहबाधा, शत्रूबाधा, भुत प्रेत पिशाच्चबाधा, करणी, भानामती, तसेच ईंद्र, कलि, माया निर्मित संकट मालिकांपासुन मुक्तता मिळते. मायेची तोड फक्त श्री काळभैरवच आहेत. हे देव रुद्रच असल्याने त्यांना आदिपुरूष म्हणता येईल. श्री  काळभैरव यांची कठोर साधना साधकाला सर्व दैत्य, पिशाच्च शक्तींवर हुकुमी सत्ता मिळवुन देते. पण भक्ताची पात्रता देखील तशीच असावी लागते. हे दैवत विधिलिखितही अडवतं. श्री काळभैरव शैतानी शक्तीना नाचविणारे एकमेव ज्वलंत दैवत आहे.

विवेकशील संय्यमी आणि पारदर्शी चारित्र्य असणे हे श्री काळभैरव भक्तांसाठी प्राथमिक पात्रता असून त्यांच्याकडे व्याभीचार लबाडी आणि खोटेपणास थारा नाही. खोटेपणा करणाऱ्या लोकांसाठी श्री काळभैरव उग्र दैवत आहे, मृत्युपेक्षाही भयानक आहेत, उलट सदगुरुदासां साठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल आहेत. गोस्वामी तुलसीदास यानी देखील भैरवयातना भोगल्या आहेत. श्री काळभैरव यांच्या निर्व्याज साधनेने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होतो. मनात भय रहात नाही, आंतरिक विचारात बळ येते, जीवनाचा दृष्टीकोण विशाल होतो, शैतानी शक्तीपासुन आत्मरक्षा होते, अंतर्बाह्य शत्रूच्या पकडीतुन मनुष्य दुर जातो, आध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होते, कठिण कार्य सहज पूर्ण होतात, आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते, काली मातेची साधना योग साध्य होतो.

सदगुरु हे कामधेनु आहेत. श्री काळभैरव तत्व सदगुरु अधीन असल्याने सदगुरु प्रणित सूक्ष्म हस्तपादुका माळेने दश भैरवांची जप साधना केल्यास सर्व लक्ष्मींची प्राप्ती होते, पण श्री काळभैरवांच्या लेखी चुकीला माफी नाही. श्री काळभैरव यांनी  मृत्यु, देवराज ईंद्र, ब्रम्हदेव, नृसिंहदेव आणि भगवान विष्णु यांचा गर्वहरण केले होते, लोकांनाच काय तर साधु योगिजनाना देखील त्यांचा अभ्यास होवु शकला नाही. श्री काळभैरव हे मोक्षप्राप्तीसाठीचे श्री दत्त अधिष्ठान हृदयात तयार करतात. शनी हा काळभैरव देवांचा सर्वात मोठा भक्त आहे. 

श्री काळभैरव जितके सिद्ध योग्यांचा आहे तितकाच महाचांडाळांचाही आहे, म्हणुनच प्रामाणिक आणि पारदर्शी रहावे. श्री काळभैरव दैवत देहातील वासनेची कर्म नष्ट करतात . काळभैरवाना क्षेत्रपाल असेही म्हणतात, क्षेत्र म्हणजे शरीर, पाल म्हणजे पालन करणारा, तो कर्म आणि अकर्माच्या गोंधळातुनही सोडवितो. 'ॐ काळभैरवाय नम:' हा देवाचा जपमंत्र आहे. जपासाठी रुद्राक्षमाळा वापरतात. स्फटिक माळही चालते . महिला देखील हा जप करु शकतात. प्रामाणिक असल्यावर देवापुढे स्त्री पुरुष हा भेद रहात नाही. भैरवप्रहर हा रात्री १२ ते पहाटे ३ असा आहे.  ह्या प्रहरात भैरवसाधना केल्यास अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते.  

श्री काळभैरव पाताळवासी आहेत. त्याना दक्षिणेश्वर असेही म्हणतात, नक्षत्रे त्यांच्या आज्ञेची प्रकर्षाने वाट पहातात. त्याना प्रसन्न केल्यास नक्षत्रांचे फळ तुमच्या नशिबात सहज येते, श्री काळभैरवाच्या आज्ञेशिवाय कोणत्याही सूक्ष्मक्षेत्रात प्रवेश नाही, नकारात्मक उर्जा डोक्यात आणि शरीरास जाणवत असेल तर सलग सहा महिने श्री काळभैरव साधना करावी. त्याची साधना निर्गुणात सरस बनविते. आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातुन निर्गुणात अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे. श्री काळभैरवांचा विनाअट ध्यास घेता आला पाहिजे. त्यांचा ध्यास लावाल तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागेल. धरसोडवृत्ती ठेवल्यास ते भाव देणार नाहीत  

श्री काळभैरवांची अनुभूती येणे ही आत्ममार्ग निर्धोक सुरु असल्याची पुष्टी करते. श्री काळभैरवाच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही. भैरवनाथ प्रामाणिक आणि तळमळीला धावुन येतात. मन हृदय आणि नियती स्वच्छ हवी. सदगुरुभक्ती सुख दु:खाच्या पलीकडे गेल्यास दैव सदभक्ताला जीवनाच्या आपदास्थितीत पाठीशी घालतं. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने