खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 


केंद्र आणि राज्य शासन परवडणाऱ्या घरांसाठी ग्रामीण व शहरी भागात घरकुलाच्या योजना राबवित आहे. शासनाप्रमाणेच खाजगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी सामाजाचे आपण देणं लागतो या भावनेतून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. एक्स्पोच्या माध्यमातून सामान्य माणसाला त्याच्या स्वप्नातलं घर मिळण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये उज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे क्रेडाई नाशिक मेट्रोद्वारे आयोजित गृह प्रदर्शन शेल्टर 2022 चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले.यावेळी ते बोलत होते 

मुख्यमंत्री श्री शिंदे पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाला त्याच्या हक्काच घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. सर्वांसाठी घरे या संकल्पनेतून ही योजना सामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातही शहरी आणि ग्रामीण भागात या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले आहेत. ही योजना राबविण्यात महाराष्ट्र अग्रसेर असल्याचे श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवर, महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष सुनील फरदे, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन, राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, कृणाल पाटील, गौरव ठक्कर महाराष्ट्र क्रेडाईचे सचिव सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष किरण चव्हाण, ललित रूंगठा आदी मान्यवर व बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने