आता हि आयटी कंपनी दाखवणार कर्मचा-र्यांना घरचा रस्ता

 


कोरोना महामारीचा दोन वर्ष सामना केल्यानंतर जगातील सगळ्याच देशांची आर्थिक व्यवस्था हळूहळू रुळावर येत होती. मात्र, आता पुन्हा एकदा जगभरात मंदीचे वारे वाहू लागलं असून अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढून टाकण्यास सुरुवात केलीय. टि्वटरनं कर्मचारी कपात केल्यानंतर अनेक बड्या आयटी कंपन्यांनी सुद्धा कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक पातळीवरील प्रमुख कंपनी हेवलेट पॅकार्ड (HP) देखील हजारो कर्मचाऱ्यांना घरी पाठविण्याच्या तयारीत आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिलंय.

 एचपी कंपनी पुढील तीन वर्षात 6 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचं नियोजन करीत आहे. पर्सनल कॉम्प्युटरची घटती मागणी, आणि सातत्यानं कमी होत असलेला महसूल लक्षात घेऊन कंपनीनं हा निर्णय घेतलाय.आतापर्यंत मेटा आणि ॲमेझॉन यांनी अंदाजे 10,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले असुन, ट्विटरनं देखील त्यांच्या 7,500 कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. तर सिस्को कंपनीनं गेल्या आठवड्यात कर्मचारी कपात आणि ऑफिसची संख्या कमी करण्याची घोषणा केली. हार्ड ड्राइव्ह निर्माता सीगेट टेक्नॉलॉजी होल्डिंग्स पीएलसीनेही सुमारे 3,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची घोषणा केली आहे. आता कर्मचारी कपात करणाऱ्या या कंपनीच्या यादीमध्ये एचपी कंपनीची सुद्धा भर पडणार आहे.

एचपी कंपनीचे सीईओ एनरिक लॉरेस यांच्या घोषणेनुसार, एचपी कंपनी त्यांच्या रिअल इस्टेट फूटप्रिंट कमी करेल, आणि खर्च नियंत्रित करण्यासाठी पुढील तीन वर्षांत कंपनीच्या 61,000 जागतिक कर्मचाऱ्यांपैकी 10 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करेल. कंपनीसाठी रिस्टक्चरिंग कॉस्ट एकूण 1 अब्ज डॉलर अपेक्षित आहे, ज्यापैकी सुमारे 60 टक्के नवीन आर्थिक वर्ष 2023 मध्ये कमी होणे सुरू होईल. एचपी कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025 च्या अखेरीस वार्षिक 1.4 अब्ज डॉलर वाचवण्याची कंपनीची योजना आहे.

दुसरीकडे जगभरात नोकरी कपातीचे वारे सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा नोकरदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोरोना महामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. यामधून सावरत असतानाच आता मंदीच्या लाटेमुळे पुन्हा एकदा नोकरदारवर्ग संकटात आला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने