स्वतःसाठी वेळ द्या तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही

 


जगातील सर्व यशस्वी लोक आज यशस्वी आहेत, कारण ते स्वतःसाठी वेळ देतात. तुम्ही घरून काम करत असाल किंवा ऑफिसमध्ये. कामासोबतच तुम्ही तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडेही पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्ही आठवड्यातले 5 तास काहीतरी नवीन शिकण्यात आणि स्वतःच्या प्रगतीसाठी घालवत असाल, तर तुम्ही स्वतःसाठी एक यशोगाथा लिहित आहात, यावर विश्वास ठेवा. 

सध्याच्या युगात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमासोबतच स्मार्ट वर्कही करणं गरजेचं आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सातत्यानं नवनवीन गोष्टी शिकणं केव्हाही फायद्याचं ठरतं. पण एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी वेळही द्यावा लागतो. मात्र, जर तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यासाठी एका आठवड्यात 5 तासांचा वेळ स्वतःसाठी दिलात, तर तुमचा यशाचा आलेख उंचावल्याशिवाय राहणार नाही. जगातील बहुतांश यशस्वी लोक हा ‘5 तासांचा सिद्धांत’ पाळतात. आठवड्यातून किमान 5 तास स्वयं शिक्षणासाठी दिले पाहिजेत.

 5 तासांचा सिद्धांत सांगतो की, दररोज किमान 1 तास आणि आठवड्यातून 5 तास स्वतःला काहीतरी नवीन शिकण्यासाठी द्या, किंवा स्वतःला विविध उपक्रमांमध्ये गुंतवा. तुम्ही कितीही यशस्वी झालात तरीही, हा सिद्धांत लक्षात ठेवा. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क देखील रोज काहीतरी नवीन शिकण्याच्या प्रयत्नात मग्न असतात. ते सांगतात, ‘मला काम करायला मजा येते. मी आठवड्यातून 120 तास काम करतो.’ मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स देखील त्यांच्या फावल्या वेळेत पुस्तके वाचतात. स्वतःसाठी 5 तास काढल्यानंतर त्याचा उपयोग नवीन शिकण्यासाठी कसा करू शकता, हे जाणून घेऊयात.

पुस्तकांचे नियमित वाचन: पुस्तकांचे नियमित वाचन केल्यानं तुमचं ज्ञान वाढण्यास मदत होऊ शकते. एखादं पुस्तक वाचून तुम्ही तुमची विचारशक्ती वाढवू शकताच,  पण यासोबतच प्रत्येक गोष्टीकडं तुमचा पाहण्याचा दृष्टिकोनही विकसित होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही पुस्तके वाचण्याचं ध्येय ठेवणे फायद्याचं ठरतं. पुस्तके व्यक्तीच्या जीवनातील एकसुरीपणा तोडतात, आणि जेव्हा जीवनात अपयश येते, तेव्हा नव्यानं उभारी घेण्यास प्रोत्साहन देतात. इलॉन मस्क हे रॉकेट कसे बनवायचे, हे जाणून घेण्यासाठी वाचन करतात. तर, बिल गेट्स सुट्टीच्या दिवशी पुस्तकांचे वाचन करतात. ते वर्षाला किमान 50 पुस्तके वाचतात.

नवनवीन प्रयोग करा: तुमच्या कामात नेहमी काही ना काही प्रयोग करीत राहा. जर तुम्ही आठवड्यातले 5 तास नवनवीन प्रयोग करण्यासाठी दिलेत, तर तुम्ही नक्कीच काहीतरी नवीन शिकता. तुम्ही जे काम करीत असाल, त्यासंबंधी नवनवीन गोष्टी शिकत असल्यास तुम्ही तुमच्या कामात स्पर्धेच्या बाहेर कधीच राहणार नाही. जर इलॉन मस्क यांनी नवीन गोष्टी करून पाहण्याचं धाडस दाखवलं नसतं, तर आज त्यांची कंपनी स्पेस एक्स रॉकेट लाँच करणारी पहिली खासगी कंपनी ठरली नसती.

एखाद्या माहितीचे विश्लेषण करा: कोणतीही माहिती समजून घेण्यासाठी त्याचे विश्लेषण करणं खूप महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला नवीन काही माहिती मिळाली असेल किंवा तुम्ही वाचली असेल, तर त्याबद्दल विश्लेषण करा. त्यामुळे विचार करण्याची समज विकसित होते. पुस्तके वाचा आणि त्यावरुन नोट्स तयार करा. पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या मनात जे काही प्रश्न पडले आहेत, ते तुम्ही लिहून ठेवू शकता.

आनंदी राहण्यासाठी आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी,  आपण स्वत: सोबत थोडा वेळ घालवणं आवश्यक आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वजण इतके व्यस्त झाले आहेत की, ते स्वतःचा विचारही करू शकत नाही. पण आठवड्यातून 5 तास स्वतःला देऊन तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. जीवनात प्रत्येकजण कठोर परिश्रम करतो, परंतु प्रत्येकाला अपेक्षित यश मिळत नाही. पण आजच्या काळात स्वतःला अपडेट करण्यासाठी नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी वेळ दिल्यास करिअर, व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी त्याचा फायदा होण्याची शक्यताच अधिक असते. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने