शिखर धवनच्या या रणनीतीने टीम इंडियाला मिळाली हार काय असेल पुढील सामन्यात रणनीती ?

 


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमध्ये खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा 7 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या पराभवानंतर क्रिकेट विश्लेषक भारतीय संघाच्या कामगिरीची चर्चा करत आहेत. या सामन्यात ऋषभ पंत आणि सूर्यकुमार या सारख्या फलंदाजाची कामगिरी निराशाजनक झाली तर युझवेंद्र चहल आणि अर्शदीपसारखे खेळाडू गोलंदाजीत फ्लॉप ठरले. याशिवाय भारताच्या खेळाडूंनी अनेक झेलही सोडले, जे टीम इंडियाच्या पराभवाचे मुख्य कारण आहे.

याशिवाय कर्णधार शिखर धवनच्या खेळाडूंच्या निवडीच्या रणनीतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघाचा स्टार स्विंग गोलंदाज दीपक चहरला स्थान मिळाले नाही, त्याच्याऐवजी शार्दुल ठाकूरची निवड करण्यात आली. दीपक चहर सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेण्यात माहिर आहे, त्याला त्याच्या स्विंग गोलंदाजीने फलंदाजांना कसे अडचणीत आणायचे हे माहित आहे. याशिवाय धवनच्या प्लेइंग इलेव्हनमधील आणखी एक त्रुटी म्हणजे तो केवळ 5 गोलंदाजांसह मैदानावर उतरला.

हार्दिक पांड्या टी-20 मालिकेनंतर मायदेशी परतला आहे, तर रवींद्र जडेजा दुखापतीमुळे बाहेर आहे. हे दोन खेळाडू टीम इंडियात अष्टपैलू खेळाडूंची महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या अनुपस्थितीत दीपक हुडा हा संघातील एकमेव खेळाडू आहे जो अष्टपैलूची भूमिका बजावू शकतो. मात्र, असे असतानाही धवनने त्याला संधी दिली नाही.

धवनच्या या स्ट्रॅटेजीचा तोटा म्हणजे भारताकडे गोलंदाजीचा दुसरा पर्याय नव्हता. धवनशिवाय गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि संजू सॅमसन हे संघात होते. यापैकी एकही खेळाडू गोलंदाजी करत नाही. अशा स्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला सहाव्या गोलंदाजाची कमतरता जाणवली.

या सामन्यातील भारतीय गोलंदाजी बद्दल बोलायचे झाल्यास, वॉशिंग्टन सुंदर वगळता प्रत्येक गोलंदाजाने 6 पेक्षा जास्त इकॉनॉमीसह धावा दिल्या, दुसरीकडे, एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्शदीप सिंगने 8.1 षटकात एकही विकेट न घेता सर्वाधिक 68 धावा दिल्या. जर धवन येथे अष्टपैलू खेळाडू घेतला  असता तर अर्शदीपला इतकी षटके देण्याची गरज पडली नसती.

दीपक हुड्डा शिखर धवनकडे एकमेव अष्टपैलू खेळाडू आहे. दुसर्‍या वनडेतही भारताने 5 गोलंदाज सोबत घेतल्यास त्यांना दीपक हुड्डाला संघात स्थान द्यावे लागेल, अन्यथा संघ दीपक चहरसह 6 गोलंदाजांच्या पर्यायांसह खेळू शकतो. शिखर धवन आता रणनीती बदलून कोणता फलंदाज संघातून वगळेल हे पाहण्यासारखे आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने