उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास व इतर विषयांबाबत आज सविस्तर आढावा बैठक घेतली. त्यात बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची कामे सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करुन वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री यांनी दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी विहित कालावधीचे उद्दिष्ट ठेवावे. कोविड काळात ताब्यात घेण्यात आलेल्या इमारती कामासाठी त्वरित रिकाम्या करून घेण्यात याव्यात. पात्रतेचे विषय तातडीने निकाली काढावेत, भाडे आधीच देऊन स्थलांतराची कामे तातडीने सुरू होतील याकडे लक्ष देण्यात यावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
या पुनर्वसन प्रकल्पांतर्गत एकूण 195 चाळी मिळून 15,593 सदनिका निर्माण होणार आहेत. वरळी येथील चाळींचे काम सुरू झाले असून, नायगाव येथील चाळींचे काम जानेवारीपासून सुरू होत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची कामे, कामाठीपुरा क्लस्टर पुनर्विकास यांच्या सद्यस्थितीबाबत सादरीकरण करण्यात आले.यावेळी गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह. मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा