देशात नवा राजकीय पर्याय उदयास येत आहे का ?

 


गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-काँग्रेससोबतच आम आदमी पक्षानेही आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. एआयएमआयएम देखील याला अपवाद दिसत नाही. अशा स्थितीत देशात नवा राजकीय पर्याय उदयास येत असून हे पक्ष तिसरी शक्ती म्हणून उदयास येत आहेत का, या चर्चेला बळ मिळत आहे.

प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचा जनाधार हळूहळू कमी होत आहे. पक्षाचे सरकार फक्त छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये उरले आहे. त्याचवेळी आम आदमी पार्टी आणि असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष AIMIM यांचा काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचा पराभव करत 'आप'ने विजय मिळवला. तर एआयएमआयएम ने बिहारमधील महाआघाडीला धक्का दिला.

बसपाचा विस्तार काही वर्षांपूर्वीपर्यंत झपाट्याने झाला होता. 2022 मध्ये यूपीसह पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये, बसपाला तीन राज्यांमध्ये केवळ चार जागा मिळाल्या आणि त्यांचा विस्तार थांबला. दुसरीकडे 'आप'ने आपला पाठिंबा झपाट्याने वाढवला. दिल्ली आणि पंजाबमध्ये पक्षाचे सरकार आहे. तर हा पक्ष  गुजरातमध्ये पूर्ण ताकदीने लढत आहे. अशा स्थितीत गुजरातमध्ये 'आप' प्रमुख विरोधी पक्ष बनणार का, अशी भीती काँग्रेसला आहे. आतापर्यंच्या इतिहासात जिथे तिसरी शक्ती उदयास आली तिथे काँग्रेस पुन्हा सत्तेत आलेली नाही.

गुजरात निवडणुकीतही ओवेसी पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. ओवेसींचा पक्ष जिंको किंवा न जिंको, तो इतर पक्षांची गणिते बिघडू शकतो. बिहार निवडणुकीत ओवेसींच्या पक्षाने पाच जागा जिंकल्या. त्याचवेळी या पक्षाने सुमारे डझनभर जागांवर राजद आणि काँग्रेसचे गणित बिघडवले. तृणमूल काँग्रेसही बंगालबाहेर आपला जनाधार वाढवण्यात गुंतली आहे. मात्र, त्याला आप आणि एआयएमआयएम सारखे यश मिळालेले नाही. तृणमूलचे संपूर्ण लक्ष ईशान्येकडे आहे. गोवा निवडणुकीत पक्षाला फारसे यश मिळाले नाही. दरम्यान, तृणमूलने अनेक काँग्रेस नेत्यांना त्यांच्या पक्षात प्रवेश दिला आहे.

गेल्या काही वर्षांत अनेक पक्ष झपाट्याने उदयास आले आहेत. विधानसभा निवडणुकीतही हे पक्ष प्रभाव टाकत आहेत. त्याकडे जनतेच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास 'आप' हा पर्याय म्हणून उदयास येऊ शकतो, असे दिसते. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र अधिक स्पष्ट होईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने