आमचा चित्रपट म्हणजे जीवनाचा सोहोळा आहे’ : आर्टुरो माँटेनेग्रो

 


मेणबत्त्या, केक, दिवे आणि मित्र....... वाढदिवशी एखाद्याला आणखी काय हवे? समुद्रकिनारी असलेल्या एका घरात जिमी मित्रांसह त्याचा 45 वा वाढदिवस साजरा करत असतो. केक कापल्यानंतर आपण आत्मघात करण्याचे ठरवत होतो असे त्याने सांगितल्यावर परिस्थिती पूर्णपणे बदलून जाते.

बर्थडे बॉय (कम्प्लीनेरो) (2022) हा पनामाचा चित्रपट आर्टुरो माँटेनेग्रो यांनी दिग्दर्शित केला आहे. गोवा येथे सुरु असलेल्या 53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित केलेल्या ‘टेबल टॉक्स’ या चर्चात्मक कार्यक्रमात ‘बर्थडे बॉय’ या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक आर्टुरो माँटेनेग्रो यांनी जगातील आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणाचा उल्लेख केला. “बर्थडे बॉय हा चित्रपट मैत्रीबद्दल भाष्य करतो. आपल्यासमोर फक्त वर्तमानकाळ आहे आणि भविष्याची चिंता करणे व्यर्थ आहे,” असे आर्टुरो यांनी  सांगितले.

या चित्रपटाचे कथाकार आणि निर्माते अँड्री जे. बॅरिएंटोस हे देखील या टेबल टॉक्स मध्ये उपस्थित होते. ते म्हणाले, “या चित्रपटाची कल्पना महामारीच्या काळात सुचली. त्या काळात आपण मोठ्या प्रमाणात मृत्यूबद्दल बोलत होतो.” हा चित्रपट अमायोट्रॉफीक लॅटरल स्क्लेरॉसिस (एएलएस) या आजाराविषयी माहिती देतो चित्रपटाचे मुख्य पात्र या आजाराने ग्रासलेले आहे. “या चित्रपटात एएलएसविषयी संवाद घडतो, चित्रपटासाठीचा विषय म्हणून या विषयाला याआधी कोणीही हात घातलेला नाही,” दिग्दर्शक म्हणाले.  या आजाराविषयी माहिती देताना ते म्हणाले, “संवाद साधणे शक्य न होणे हे खरोखरच गुदमरून टाकणारे आणि निराशाजनक आहे.”

बर्थडे बॉय हा चित्रपट या वर्षी अकादमी पुरस्कारांच्या देखील स्पर्धेत आहे. “तुमच्या देशाचे प्रतिनिधित्व करणे ही अत्यंत सुंदर गोष्ट आहे. अशावेळी वाटतं की तुम्ही तुमचा राष्ट्रध्वज मिरवता आहात,” आर्टुरो माँटेनेग्रो भावना व्यक्त करत म्हणाले. “बर्थडे बॉय हा चित्रपट म्हणजे जीवनाचा सोहोळा आहे. आमचा चित्रपट अत्यंत व्यक्तिगत पातळीवरचा आहे आणि त्यात जन्म आणि मृत्यू यांबद्दल विवेचन आहे. हा चित्रपट जीवनाचे वर्तुळ दर्शवतो,” दिग्दर्शक  म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने