'काश्मीर फाईल्स' मुळे जगभरातील लोकांना 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांची जाणीव होण्यास मदत झाली, असे चित्रपटातील प्रमुख अभिनेते अनुपम खेर म्हणाले. गोव्यातील पणजी येथे 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त आयोजित इफ्फी टेबल टॉक्समध्ये ते सहभागी झाले होते.
“हा सत्य घटनांवर आधारित चित्रपट आहे. चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटासाठी जगभरातल्या सुमारे 500 लोकांच्या मुलाखती घेतल्या. 19 जानेवारी 1990 च्या रात्री वाढत्या हिंसाचारामुळे काश्मीर खोऱ्यातील 5 लाख काश्मिरी पंडितांना त्यांची घरे आणि तिथल्या आठवणी मागे सोडून जावे लागले. एक काश्मिरी हिंदू म्हणून मी या दुःखद घटनांसोबत जगलो. मात्र असे काही घडले हे कुणीच मान्य करत नव्हते. जग ही शोकांतिका लपवण्याचा प्रयत्न करत होतं . या चित्रपटाने पडद्यावर ही शोकांतिका दाखवून त्यांचे वेदनांचे घाव भरण्याची प्रक्रिया सुरू केली ” असे अनुपम खेर पुढे म्हणाले.
त्यांनी भोगलेली शोकांतिका पुन्हा जागवताना अनुपम खेर म्हणाले की, द काश्मीर फाईल्स हा त्यांच्यासाठी केवळ एक चित्रपट नाही, तर त्यांनी पडद्यावर चित्रित केलेली एक भावना आहे. “ज्या लोकांना त्यांच्या घरातून हाकलून देण्यात आले, त्यांचे मी प्रतिनिधीत्व करत असल्याने, ते शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने व्यक्त करणे ही माझी मोठी जबाबदारी होती असे मी मानतो. माझे अश्रू, माझ्या वेदना ज्या तुम्ही या चित्रपटात पाहत आहात ते सगळे खरे आहे,” असे ते म्हणाले.
अनुपम खेर पुढे म्हणाले की, या चित्रपटात आपल्या कलेचा अभिनेता म्हणून वापर करण्याऐवजी, वास्तविक जीवनातील घटनांमागील सत्याला अभिव्यक्ती देण्यासाठी त्यांनी आपल्या आत्म्याचा वापर केला. कधीही हार मानू नका ही या चित्रपटामागील मुख्य संकल्पना असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
टिप्पणी पोस्ट करा