सरकार स्थापन करून त्यांनी केलेल्या विश्वासघाताचा बदला घेतला

 


महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, 2019 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढवण्याची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केली होती. त्यानंतर शिवसेना आणि भाजपने मिळून मला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला. अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय झाला नव्हता. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली तेव्हा आम्ही साफ नकार दिला.

पालघरची जागा आणि शिवसेनेला अतिरिक्त मंत्रिपद देण्याचे आश्वासन आम्ही दिले होते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र, शिवसेनेने आमचा विश्वासघात केला. उद्धव ठाकरेंनी माझ्या आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. तेव्हापासून आम्ही योग्य वेळेची वाट पाहत होतो. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या वागणुकीमुळे एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याबाबत माहिती मिळाल्यावर आम्ही थोडेच असे म्हणणार  होतो की तुम्ही (एकनाथ शिंदे) उद्धव ठाकरेंसोबत परत जा.इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे स्पष्ट केले  

पुढे बोलताना ते म्हणाले, 'मी एकनाथ शिंदे यांना सांगितले की ते बाहेर आले हे चांगले झाले. आम्ही तुमच्या सोबत आहोंत' तसेच सरकार स्थापन करून शिवसेनेने केलेल्या विश्वासघाताचा बदला आम्ही घेतला, अशी भावना देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली ते म्हणाले, 'महाराष्ट्रात सत्तेत येण्यासाठी सत्ता परिवर्तन केलेले नाही. परंतु गेल्या अडीच वर्षात राज्यात ज्याप्रकारे घडामोडी घडल्या, त्यावरून आम्ही सरकार बदलण्याचा निर्णय घेतला. पण, तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही सरकारमध्ये सामील झालात तर याचा अर्थ तुम्हाला सत्तेची भूक लागली आहे असा होतो. म्हणूनच मी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मला वरिष्ठांनी सांगितले की तुम्ही राज्याचे महत्त्वाचे नेते आहात. यापूर्वी तुम्ही मुख्यमंत्री राहिला आहात आणि हे सरकार चालवण्यासाठी तुमच्या अनुभवाची गरज आहे. त्यामुळे मी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने