‘‘बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रीया जलदगतीने राबविण्यात यावी. नोंदणी झालेल्या कामगारांना शासकीय योजनांचा तात्काळ लाभ मंजूर करण्यात यावा.’’ असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिले. राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी, शासकीय योजनांचा लाभ, बाल व वेठबिगार कामगारांच्या प्रश्नांचा आढावा कामगार मंत्र्यांनी आज शिर्डी येथे घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
कामगारमंत्री श्री.खाडे म्हणाले, बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ देतांना त्यांच्या कागदपत्रांची जलद तपासणी करून लाभ मंजूर करणे अपेक्षित आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कामगारांची नोंदणी व लाभ देण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे.
कामगारांसाठी पहिलीपासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या शिक्षणाकरिता शैक्षणिक साहित्य, आर्थिक सहाय्य, आरोग्य व सामाजिक सुरक्षिततेच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेल्या कामगारांच्या पाल्यास शिष्यवृत्ती व इतर योजनांचा तात्काळ लाभ मंजूर करावा. अशा सूचनाही यावेळी कामगारमंत्री श्री.खाडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, कामगार विभागाचे उपसचिव दिपक पोकळे, दादासाहेब खताळ, इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे सचिव विवेक कुंभार, नाशिक कामगार उपायुक्त विकास माळी, अहमदनगर सहाय्यक आयुक्त नितीन कवले, पारनेरचे प्रांतधिकारी सुधाकर भोसले, संगमनेर तहसीलदार अमोल निकम व कामगार विभागाचे राज्यातील अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा