वृद्धापकाळात या योजनेचा लाभ घेऊन करा उदरनिर्वाह

 


बऱ्याचदा लोकांना म्हातारपणी गरजा पूर्ण करणं अवघड जातं. त्यातच जर पती आणि पत्नी असे दोघंच राहत असतील तर अजूनच अडचणींना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे ज्या वृद्ध लोकांच्या मागे कोणीही वारस नाही, आणि त्यांच्या मृत्यूनंतर घर सांभाळण्यासाठी कोणी राहणार नाही, असे त्यांना वाटत असेल व स्वतःच्या मालकीचे त्यांच्याकडे घर असेल तर ते रिव्हर्स मॉर्गेजचा(Reverse mortgage) फायदा घेऊन आपला उदरनिर्वाह करू शकतात.यामुळे वृद्धापकाळात आर्थिक मदत होते.

जसे आपण नवीन घर खरेदी करण्यासाठी, घराचं बांधकाम करण्यासाठी बँकेकडून होमलोन घेतो तसेच बँक तुमच्या घरावर रिव्हर्स लोनही देते. त्याला ‘रिव्हर्स मॉर्गेज’ म्हणतात. थोडक्यात, होम लोन घेतल्यानंतर, बँक घरासंबंधी सर्व कागदपत्रे त्याच्याकडे ठेवते, आणि तुम्हाला एकरकमी पैसे देते. त्यानंतर तुम्ही ही रक्कम हप्त्यांमध्ये (EMI) भरता. रिव्हर्स मार्गेज मात्र यापेक्षा अगदी उलट आहे. यात देखील बँक घरासंबंधी सर्व कागदपत्रे त्याच्यांकडे ठेवते, आणि तुम्हला महिन्याला ठराविक रक्कम दिली जाते वृद्धत्वाचा आधार म्हणून याकडे पाहिलं जातं. ही सुविधा जवळपास सर्वच बँकांकडून दिली जाते.

रिव्हर्स मॉर्गेजमध्ये बँक तुमचं घर गहाण ठेवून तुम्हाला दर महिन्याला पैसे देते. तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती पैसे मिळतील, हे तुमच्या घराच्या किंमतीवर अवलंबून असते. बहुतांश बँका घराच्या किंमतीवर 60 टक्क्यांपर्यंत रिव्हर्स मॉर्गेज देतात. बँकेकडून ही सुविधा घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर ते घर बँकेच्या मालकीचं होतं. रिव्हर्स मॉर्गेज घेण्यासाठी तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. हे कर्ज फक्त 15 वर्षांसाठी उपलब्ध आहे. एखाद्या व्यक्तीनं वयाची 72 वर्षे पूर्ण केली असल्यास त्या व्यक्तीला अनेक बँका ही सुविधा देत नाहीत. रिव्हर्स मॉर्गेजसाठी पती-पत्नी दोघांनी अर्ज केल्यास पतीचं वय 60 वर्षे आणि पत्नीचं वय 58 वर्षे असावे. रिव्हर्स मॉर्गेज घेणाऱ्या व्यक्तीचा त्याच्या घरावरील मालकी हक्क हा त्याच्या मृत्यूनंतरच संपतो.

रिव्हर्स मॉर्गेज घेतल्यावर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, आणि त्याचं कुटुंब किंवा इतर कोणत्याही नातेवाईकाला ज्या घरावर रिव्हर्स मॉर्गेज घेतलं आहे, ते घर हवे असेल, तर त्याला घराची किंमत बँकेला द्यावी लागते. बँकेला पैसे देऊन ती व्यक्ती घर खरेदी करु शकतो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने