कौशल्य विकास, रोजगारविषयक विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबवू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


जगामध्ये सध्या सर्वात जास्त मागणी ही कौशल्याला आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी आज मुंबईत सुरू करण्यात आलेल्या आयटीआयमधून सर्वांना संधीची समानता मिळू शकेल. तरुणांना कौशल्य आणि रोजगार मिळवून देण्यासाठी येत्या काळात शासनामार्फत विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. चेंबूर येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या (आयटीआय) इमारतीचे आज उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, सध्या पदवी इतकेच महत्त्व कौशल्याला प्राप्त झाले आहे. पदवीसोबत कौशल्य असेल तर त्याला अधिक मागणी आहे. यामुळेच केंद्र आणि राज्य शासनाने कौशल्य विकासावर अधिक भर दिला आहे. अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना प्रभावी कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून आज चेंबूर येथे सुरू होत असलेल्या आयटीआयमधून याला चालना देण्यात येईल. अर्थव्यवस्थेच्या बदलत्या परिस्थितीत संधीची समानता यामुळे तयार होईल. देशामध्ये असलेले सर्वोत्तम व्यवसाय अभ्यासक्रम या आयटीआयमध्ये सुरु करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने