मुंबई आणि ठाण्यामध्ये चित्रनगरी उभारणार असल्याची मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

 


मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचे वैभव जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, तसेच कलावंतांना मोठं व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी मुंबई आणि ठाण्यामध्ये चित्रनगरी उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या 12 हजार 500 व्या विक्रमी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

नाट्यसृष्टीत नाटकांचे तब्बल 12 हजार 500 प्रयोग अभिनेते प्रशांत दामले यांनी केले, ही राज्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी श्री. दामले यांचे अभिनंदन केले. प्रशांत दामले यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली, त्याला उत्तर देताना प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार देण्याबाबतच्या शिफारशीचा प्रस्ताव मागणी करण्याअगोदरच केंद्र सरकारला पाठवला असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले 'मराठी नाट्यसृष्टीबद्दल बोलताना जसे विष्णूदास भावे यांचे नाव घेतले जाते, तसे आता प्रशांत दामले यांचे नाव घेतले जाईल. कलेची सेवा ते सातत्याने करतात.' समर्पित भावनेने काम करणाऱ्या कलावंतांचा सन्मान होत असल्याचे ते म्हणाले. 'आता 12, 500 प्रयोग झाले, भविष्यात 25 हजार प्रयोग करावे' अशी भावना उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.यावेळी  श्री. दामले यांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने