लम्पी चर्मरोगाची संबंधित जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेऊन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी स्थानिक स्तरावर बैलगाडा शर्यतींच्या आयोजनात शिथिलता देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. मंत्री श्री. विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैलगाडा शर्यतींच्या अनुषंगाने बैलगाडा मालक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत विधानभवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. विखे- पाटील बोलत होते.
बैलगाडा शर्यती सुरू रहाव्यात ही शासनाची भूमिका असून त्यासाठी शासन खंबीरपणे आपली भूमिका बजावेल. बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणीसाठी बाजू मांडण्यासाठी नेमण्यात आलेल्या वरिष्ठ विधिज्ञांना आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाच्यावतीने देण्यात येईल, असेही श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार लांडगे तसेच बैलगाडा मालक संघटनांच्या प्रतिनिधींनी पशुसंवर्धन विभागाने लम्पी चर्मरोग उपाययोजनेसाठी गतीने लसीकरण हाती घेतल्यामुळे लम्पीचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले.बैठकीस आमदार महेश लांडगे, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह तसेच बैलगाडा मालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा