गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार : मुख्यमंत्री

 


शिवकालीन धाडशी खेळाने व शिवमय वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किल्ले प्रतापगड ता. महाबळेश्वर येथे शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  यावेळी शिवकालीन गड किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकोट किल्ले आज ही प्रेरणा देणारे स्त्रोत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, किल्ल्यांची बांधणी, पाण्याचा साठा, प्रवेश द्वार स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरणे आहेत. आज किल्ले प्रतापगडावर 363वा शिवप्रताप दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचा 100 कोटींचा आराखडा सादर केला आहे. या आराखड्यानुसार 25 कोटींचा निधी तात्काळ दिला जाईल. राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करत आहे. प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. हे सरकार सर्व सामान्य कष्टकऱ्यांचे सरकार आहे, असे सांगून राज्यातील गडकोट किल्ल्यांवर झालेले अतिक्रमण काढण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी किल्ले प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाचे मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर भवानी मातेची मनोभावे मुख्यमंत्री श्री. शिंदे  यांनी आरती केली.  छत्रपतींची मूर्ती ठेवण्यात आलेल्या पालखीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

यावेळी शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते. पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली. यानंतर प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात  आला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीनिवास पाटील,  यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने