ब्युरो टीम : ‘महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यांच्या सीमावादामध्ये अराजकता निर्माण करण्यात काही ’फेक’ ट्विटर हँडलचा मोठा वाटा असल्याचे समोर आले आहे. अशा हँडलवरून जाणीवपूर्वक भावना भडकविणारा मजकूर प्रसारित करण्यात आला आहे. त्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे असे हँडल कोणी तयार केले, ते शोधून त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणला जाणार आहे,’ असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी फेक ट्विटरच्या मुद्द्यावरही भाष्य केलं.
‘सीमाप्रश्नावर दोन्ही राज्यातील विरोधी पक्षांनी केवळ राजकीय विरोधासाठी म्हणून विरोध करू नये. दोन्ही राज्यातील जनतेच्या हितासाठी वाद वाढवू नये. याप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचा गट सहकार्य करेल,’ अशी आशा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली.
तर, दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘सीमावाद पेटवून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कुणीतरी आगीत तेल ओतत आहे. अशाप्रकारे मराठी माणसाच्या भावना कुणीही भडकवू नये. केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे आवाहन महाराष्ट्र आणि कर्नाटकने मान्य केले आहे. याप्रकरणी मंत्रीसमिती मार्फत तोडगा काढला जाणार आहे. मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी शाळा यावर अन्याय होऊ नये, ही महाराष्ट्राची ठाम भूमिका आहे.’
यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘सीमाप्रश्नावर महाराष्ट्र राज्याची भूमिका ठाम असून तीच भूमिका यापुढेही सर्वोच्च न्यायालयात मांडली जाणार आहे. त्याचप्रमाणे या प्रश्नात केंद्र सरकारने ’न्यूट्रल’ भूमिका बजवावी, अशी महाराष्ट्राची भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मान्य केली आहे. त्याचप्रमाणे बोम्मई यांच्या नावे प्रसारित करण्यात आलेले वक्तव्य आणि ट्विटर हँडल हे फेक असल्याचेही बोम्मई यांनी स्पष्ट केल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा