ब्युरो टीम : हिवाळी अधिवेशनात लोकायुक्त विधेयक मांडणार असून या कायद्याच्या कक्षेत मुख्यमंत्र्यांना आणि मंत्रिमंडळालादेखील आणणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
सोमवारपासून नागपूर येथे महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी पक्षाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
'या अधिवेशनात आम्ही नवीन लोकायुक्ताचं विधेयक मांडणार आहोत. या विधेयकाच्या माध्यमातून पहिल्यांदाच महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनाही लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत आणण्याचं काम हे सरकार करणार आहे. मंत्रिमंडळही लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या लोकायुक्त कायद्यात भ्रष्टाचार विरोधी कायद्याचा समावेश नव्हता. नवीन विधेयकात भ्रष्ट्राचार विरोधी कायद्याला लोकायुक्त कायद्याचा भाग केला आहे. लोकायुक्त हे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील. यामध्ये उच्च न्यायालयाचे अन्य दोन न्यायाधीशही असणार आहेत. ही पाच लोकांची समिती असेल. राज्यात संपूर्ण पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं पाऊल सरकारने उचललं आहे,' असं फडणवीस यावेळी म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा