ब्युरो टीम : फिफा विश्वचषक २०२२ मधील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाने गतवेळच्या उपविजेत्या क्रोएशियावर ३ गोल नोंदवत शानदार विजय मिळवला. लुसेल स्टेडियमवर हा सामना रंगला. आता अंतिम फेरीत त्याचा सामना याच मैदानावर गतविजेता फ्रान्स किंवा मोरोक्कोशी १८ डिसेंबर रोजी होईल.
फिफा विश्वचषक २०२२ मध्ये अर्जेंटिना हा अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. लिओनेल मेस्सीने आपल्या जादुई कामगिरीच्या जोरावर अर्जेंटिनाला अंतिम फेरीत नेले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाचा संघ दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. शेवटच्या वेळी २०१४ मध्ये त्यांच्या संघाला विजेतेपदाच्या लढतीत जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला होता.
तर, आतापर्यंतच्या फिफा विश्वचषकाचा इतिहास पाहिल्यास अर्जेंटिनाचा संघ सहाव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी १९३० मध्ये उरुग्वेकडून त्यांचा पराभव झाला होता. १९७८ च्या फायनलमध्ये अर्जेंटिनाने नेदरलँड्सचा पराभव करून पहिल्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. त्यानंतर १९८६ मध्ये त्यांनी अंतिम फेरीत पश्चिम जर्मनीचा पराभव केला. त्यानंतर १९९० मध्ये पश्चिम जर्मनीविरुद्ध विजेतेपदाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. त्याचवेळी २०१४ मध्येही त्यांचा जर्मनीकडून पराभव झाला होता.
टिप्पणी पोस्ट करा