Good News : भाजीपाला झाला स्वस्त! महागाई दराने गाठला २१ महिन्यातील नीचांक



ब्युरो टीम : बुधवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यात घाऊक किंमत आधारित महागाई (WPI) ५.८५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. हा महागाई दर गेल्या २१ महिन्यांचा नीचांक असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई (CPI) ५.८८ टक्क्यांवर आली आहे. ही ११ महिन्यांतील नीचांकी पातळी आहे.  डिसेंबर २०२१ मध्ये महागाई ५.५९ टक्के होती. तेव्हापासून माहागाई सतत ६ टक्क्यांच्या वर होती. ऑक्टोबर २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर तब्बल ६.७७ टक्के होती. तर सप्टेंबरमध्ये हा दर ७.४१ टक्के होता. 

दरम्यान, आता उत्पादित उत्पादने, इंधन आणि खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्याने नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई ५.८५ टक्के राहिली आहे. हाच दर ऑक्टोबरमध्ये ८.३९ टक्के, सप्टेंबरमध्ये १०.७० टक्के, ऑगस्टमध्ये १२.४१ टक्के आणि जुलैमध्ये १३.९३ टक्के हाती. गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये महागाईचा आकडा १४.८७ टक्के होता.

याशिवाय, नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाईमधील घसरणीचे मुख्य कारण म्हणजे अन्नधान्याच्या भावातील घट. या महिन्यात अन्नधान्य महागाई २२ महिन्यांच्या नीचांकांवर म्हणजे २.१७ टक्क्यांवर आली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये अन्न महागाई दर ६.४८ टक्के होता. दुसरीकडे,अन्न निर्देशांक १.८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनांची महागाईही ४.४२ टक्क्यांवरून ३.५९ टक्क्यांवर आली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने