ब्युरो टीम : तुम्ही स्टेट बँकेकडून कर्ज घेतले असेल, तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. स्टेट बँकेनं आपल्या कर्जाचं व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतलाय. बँकेनं आपल्या एमसीएलआरमध्ये ०.२५ टक्क्यांनी वाढ केलीय. याचा परिणाम म्हणून ग्राहकांना कर्जावर पूर्वीपेक्षा जास्त हप्ता म्हणजे ईएमआय भरावा लागेल. एसबीआयचे नवीन दर आजपासून लागू होतील.
स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्व मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट ०.२५ टक्क्यांनी वाढवले आहेत. म्हणजेच ग्राहकांना कर्जावर पूर्वीपेक्षा जास्त हप्ता भरावे लागेल. बँकेने एमसीएलआरमध्ये केलेली वाढ आजपासून लागू होईल. ही माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागील आठवड्यात रेपो दरात वाढ केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानेही व्याजदरात वाढ केली आहे.
दरम्यान, आरबीआयच्या पतधोरण समितीच्या डिसेंबर बैठकीत रेपो दरात ०.३५ टक्क्यांची वाढ केली. या वाढीसह आता रेपो दर ६.२५ टक्के झाला आहे. रेपो दरात ही सलग पाचवी वाढ होती. मे २०२२ मध्ये रेपो दरात ०.४० टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ०.५० टक्क्यांची वाढ करण्यात आली. याचाच अर्थ रिझर्व्ह बँकेने मे २०२२ पासून दरात २.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. रेपो दरात वाढ होत असल्यामुळे कर्जाचं व्याजदर सुद्धा वाढत आहे.
टिप्पणी पोस्ट करा