ब्युरो टीम : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले आहे. करोना काळानंतर नागपूरमध्ये होणारं हे पहिलेच अधिवेशन आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, शेतकरी आत्महत्या, अतिवृष्टी, राज्यातून गेलेले प्रकल्प यासह विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. तसेच विरोधकांच्या हल्ल्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी सत्ताधारीदेखील सज्ज आहेत. दरम्यान, सध्या विरोधी पक्षातील नेत्यांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधी घोषणाबाजी सुरू आहे. घोषणाबाजी करणाऱ्या नेत्यांमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अशोक चव्हाण, धनंजय मुंढे, जितेंद्र आव्हाड, आदिती तटकरे आदींचा समावेश आहे.
हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारीदेखील सज्ज आहेत. विरोधकांच्या आरोपांना आकडेवारीसह उत्तर देण्याची तयारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे हे अधिवेशन तापण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच वाहतूक व्यस्थेतही अनेक बदल करण्यात आले आहे. विधानभवन परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयातून पासेस घ्याव्यात, वॉकर स्ट्रीटवर मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने पोलीस जिमखानाजवळील पुलाजवळून पुढे सीपी क्लब या मार्गावर उभी करावी, विधानभवन परिसरात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यानी ओळखपत्र सोबत बाळगावे, अशा सुचनादेखील पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा