ब्युरो टीम : सीमाप्रश्नी राजकारण होत असल्याचा आरोप विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करीत अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. ‘सीमावासियांच्या योजनांचा निधी कुणी थांबवला, सत्तेत असताना त्यांच्यासाठी काय केलं? आज जे आंदोलनाची भाषा बोलतात, ते त्यावेळी कुठे होते, ज्यावेळी आम्ही लाठ्या काठ्या खात होतो, छगन भुजबळ आंदोलन करण्यासाठी कर्नाटकात पोहोचले, तिथे लाठ्या खाल्ल्या, आम्हीही त्यांच्याबरोबर मार खाल्ला, त्यावेळी आताचे जोरजोरात बोलणारे नेते कुठे होते? असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
आजपासून नागपुरात महराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीच्या सत्तेनंतर राज्यात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षाने पूर्ण तयारी केली तर, हल्ले परतवून लावण्यासाठी राज्यकर्तेही सज्ज झाले आहे. आज अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्र्यांनी तितक्याच ताकदीने विरोधकांना उत्तर दिलं.
सीमा प्रांतात महाराष्ट्रातील लोकांची धरपकड सुरू आहे. तिकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई धमकीची भाषा करतात. महाराष्ट्र सरकार आक्रमक शब्दात उत्तर द्यायलाही तयार नाही. अमित शहा आणि दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यात काय चर्चा झाली, हे महाराष्ट्राला कळावे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाची बाजू स्पष्ट करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेऊन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच बोम्मईंचं ते अकाऊंट फेक असल्याचा पुनरुच्चार करताना बोम्मईंच्या ट्विटरवरुन कुणी ट्विट केले अन् कोणत्या पक्षाशी ते संबंधित आहेत, याची माहिती पोलिसांना कळालीये, असेही शिंदे यांनी सभागृहात सांगितलं.
टिप्पणी पोस्ट करा