ब्युरो टीम : गेल्या काही दिवसांपासून चिघळलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर महत्त्वपूर्ण तोडगा निघण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत शहांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील आज दिल्लीत येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर आज संध्याकाळी या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर चर्चा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मागच्या काही दिवसांपासून चिघळलेला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांना अडवण्यात आलं. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. दोन्ही बाजूने टीका टिप्पणीही केली जात आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दोन आठवड्यांपूर्वी सीमाप्रश्नी आक्रमक भूमिका घेतली होती. बेळगाव परिसरातील गावं कर्नाटकचीच असून महाराष्ट्रातील अक्कलकोट, सोलापूर, सांगलीतील इतरही गावांवर त्यांनी दावा सांगितला होता. तसेच देवेंद्र फडणवीस याप्रकरणी चिथावणीखोर वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील सीमाभागात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
त्यातच आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. यासाठी दिल्लीत आज बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत सीमाप्रश्नासंबंधी आतापर्यंत झालेल्या घडामोडींवर चर्चा होणार आहे. तसेच सुप्रीम कोर्टात दाखल खटल्याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बैठक झाली तर या बैठकीला नेमकं कोणकोण उपस्थित राहणार, नेमका बैठकीत काय निर्णय होणार, याकडे दोन्ही राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा