ब्युरो टीम : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाविषयी दोन्ही राज्यांच्या प्रत्येकी तीन मंत्र्यांची समिती स्थापन केली जाणार असून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्यांनी वाद टाळण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे याप्रश्नी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने वाद वाढवू नये, असेही आवाहन शाह यांनी केले.
‘सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यांनी घटनासंमत शांततेच्या मार्गाचा अवलंब करण्याचे ठरवले आहे. याप्रकरणी दोन्ही राज्यांच्या प्रत्येकी तीन अशी सहा मंत्र्यांची एक समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती वादाच्या मुद्द्यांवर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी काम करणार आहे. त्याचप्रमाणे ही समिती आपला अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयास सादर करणार आहे. त्याचप्रमाणे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत दोन्ही राज्यांनी शांतता कायम ठेवण्याविषयी एकमत व्यक्त केले आहे,’ असेही शाह यांनी सांगितलं.
‘दोन्ही राज्यातील सीमावर्ती भागात कायदा व सुव्यवस्था राखणे, भावना भडकविण्यास प्रतिबंध घालणे आणि दोन्ही भाषक नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी दोन्ही राज्ये कटिबद्ध आहेत. त्यासाठी दोन्ही राज्ये परस्परसमन्वयाने भारतीय पोलीस सेवेतील एका वरिष्ठ अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार आहोत,’ अशी माहितीही अमित शाह यांनी यावेळी दिली.
टिप्पणी पोस्ट करा