Maharashtra Karnataka Demarcation : मुंबईत दिसणाऱ्या कर्नाटकच्या जाहिरातीवरून रोहित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा

 



ब्युरो टीम : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. कर्नाटक संघटनांकडून महाराष्ट्रातील नेत्यांना सातत्याने धमक्या येत आहेत. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्रात मुंबईमध्ये बसवर कर्नाटकच्या जाहिराती दिसत असल्याने त्यावरूनही वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला असून, मुंबईत अशा जाहिराती बघितल्यावर नक्कीच खंत वाटते. आपल्या सरकारने विचार करायला हवा,असे मत व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मागच्या काही दिवसांपासून चिघळलेला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांना अडवण्यात आलं. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. दोन्ही बाजूने टीका टिप्पणीही केली जात आहे. त्यातच यासर्व पार्श्वभूमीवर रोहित पवार हे बेळगाव दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी बेळगावातील मराठी बांधवांसोबत बातचित करून त्यांचे प्रश्नही जाणून घेतले. आता पुन्हा एकदा रोहित पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.



मुंबईमध्ये बससेवर दिसणाऱ्या कर्नाटकाच्या  जाहिरातीवरून रोहित पवार यांनी ट्विट करीत राज्य सरकावर आज निशाणा साधला. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, कर्नाटकच्या लोकांना विरोध नाही, परंतु सीमा भागातील मराठी भाषिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता तसेच सीमाप्रश्नावरून #मराठी अस्मिता दुखावण्याचे व महाराष्ट्राला आव्हान देण्याचे कर्नाटक सरकारचे धोरण बघता मुंबईत अशा जाहिराती बघितल्यावर नक्कीच खंत वाटते. आपल्या सरकारने विचार करायला हवा.

दरम्यान, रोहित पवार यांच्या टिकेनंतर आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने