ब्युरो टीम : काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांना आव्हान देणारे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक खुली ऑफर दिली आहे. राष्ट्रवादीमध्ये यावे, तुमची तिरुअनंतपुरमची खासदारकी कायम राहील, अशी ऑफरच केरळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पीसी चाको यांनी थरूर यांना दिली आहे. विशेष म्हणजे चाको यांच्या या ऑफरनंतर थरूर यांनीदेखील प्रतिक्रिया दिलीय.
केरळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पीसी चाको यांनी शशी थरुर यांना राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. ‘शशी थरूर यांची राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांचे आनंदाने स्वागत करू. काँग्रेस पक्षाने नाकारल्यानंतरही त्यांची तिरुअनंतपुरूम येथून खासदारकी कायम राहील. काँग्रेस त्यांच्याकडे दुर्लक्ष का करत आहे, हे मला समजत नाहीये,’ असे पीसी चाको म्हणाले.
चाको यांच्या या ऑफरनंतर खुद्द शशी थरूर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला राष्ट्रवादीत जायचे असल्यास स्वागताची गरज भासेल. मात्र मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार नाही. पक्षप्रवेशाबाबत पीसी चाको यांच्याशी कोणताही चर्चा झालेली नाही,’ असे ते हणाले आहेत.
दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांना थरूर यांनी आव्हान दिले होते. सध्या ते काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांच्याकडे पक्षाकडून दुर्लक्ष केला जात असल्याचा दावा केला जात आहे. तसेच थरूर यांना पक्षांतर्गत विरोधालाही सामारे जावे लागत आहे. याशिवाय, थरूर यांना समर्थन देण्याच्या मुद्द्यावरून केरळमधील काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची ही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
टिप्पणी पोस्ट करा