Nilesh lanke : नगरमध्ये आमदार लंकेचे उपोषण, विखेंची चिंता वाढली!



ब्युरो टीम : नगर -पाथर्डी-शेवगाव रस्ता, नगर -राहुरी- कोपरगाव रस्ता, नगर-मिरजगाव ते चापडगाव-टेंभुर्णी रस्ताची दुरवस्था झाली असून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्यासह अनेक नागरिक आज,बुधवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषणास बसले आहेत. दरम्यान, हे उपोषण खासदार डॉ.सुजय विखे यांची  चिंता वाढवणारे ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उपोषणस्थळी अनेकांनी मंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर जोरदार टीकास्त्र देखील सोडले आहे.

नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे असलेल्या तीन रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. यामध्ये अनेक अपघात झालेले हजारो जणांचे बळी गेले. या महामार्गाचे काम झाले नाही म्हणून संतप्त झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसह नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार लंके यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला अनेक पक्षांनी पाठिंबा देत लंके यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. कोपरगाव रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. तर पाथर्डी-शेवगाव रस्ता हा अद्याप पर्यंत झालेला नाही. त्यामुळे आमदार निलेश लंके यांनी जोपर्यंत रस्ते होणार नाही तोपर्यंत आपण उठणार नाही, असेच स्पष्ट केले.

यावेळी आमदार प्राजक्ता तनपुरे, शेवगावचे सभापती क्षितिज घुले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, उपजिल्हाप्रमुख रफिक शेख, शिवसेनेचे युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड,शाम असावा, एडवोकेट सुरेश लगड, राष्ट्रवादी काँग्रेसचे घनश्यामआण्णा शेलार, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे, बाळासाहेब हराळ, धनराज गाडे, शिवशंकर राजळे आदींसह अनेक पक्षाचे राजकीय नेते तसेच कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने