ब्युरो टीम : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी रानीप येथे मतदानाचा हक्क बजावतील. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी घेतलेली आईची भेट चर्चेचा विषय ठरत आहे.
आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरा बा यांना भेटले. यावेळी मोदींनी काही काळ आपल्या आईशी गप्पा मारल्या आणि चहा प्यायला. या भेटीनंतर सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचे फोटो व्हायरल होत आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या आईसोबत काहीवेळ घालवल्यानंतर ते येथून बाहेर पडले आणि पुढील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. या भेटीवेळी नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईशी गप्पा मारल्या. त्यांनी आपल्या आईची विचारपूसही केली. यापूर्वी देखील पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमधल्या निवडणुकांच्या निकालानंतर मार्च महिन्यात आईची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन यांनी यंदाच्या जून महिन्यात १०० व्या वर्षात पदार्पण केले होते. तेव्हादेखील नरेंद्र मोदी यांनी हिरा बा यांना भेटायला गेले होते.
नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू पंकज मोदी गांधीनगर येथील रायसन परिसरात वास्तव्याला आहेत. गेल्या काही वर्षांपासून हिरा बा येथेच राहत आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा मुक्काम दिल्लीतच असतो. ते अधुनमधून वेळ काढून आपल्या आईला भेटायला येत असतात.
टिप्पणी पोस्ट करा