ब्युरो टीम: पादचाऱ्यांना मुक्तपणे संचार करता यावा, वाहनांमुळे होणारी कोंडी आणि प्रदूषण कमी व्हावे तसेच पादचारी मार्ग, सिग्नल यंत्रणा, झेब्रा क्रॉसिंगसह अन्य पूरक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने येत्या रविवारी पुणे शहरात पादचारी दिन साजरा करण्यात येणार आहे. याकाळात पुणे शहरातील तब्बल २१ रस्त्यांवर सकाळी अकरा ते दुपारी चार यावेळेत वाहनांना बंदी असणार आहे.
पादचारी दिन साजरा करणारी पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली आणि एकमेव महापालिका आहे. त्यानुसार महापालिकेकडून दरवर्षी अकरा डिसेंबर रोजी पादचारी दिन उपक्रम राबविला जातो. यंदाही ११ डिसेंबरला म्हणजेच येत्या रविवारी लक्ष्मी रस्त्यासह शहरातील २१ मार्गांवर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक सकाळी अकरा ते दुपारी चार या कालावधीत वाहनमुक्त ठेवण्यात येणार आहेत. या ठिकाणी वॉकिंग प्लाझासह स्थानिक गटांच्या सहकार्याने लक्ष्मी रस्त्यावर मनोरंजक आणि संवादात्मक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. पादचाऱ्यांना या उपक्रमामुळे विना अडथळा मार्गक्रमण करता येणार आहे.
या रस्त्यांवर राबवण्यात येणार उपक्रम
लक्ष्मी रस्ता (उंबऱ्या गणपती ते गरुड गणपती), लाल बहादूर शास्त्री रस्ता, बिबवेवाडी रस्ता (रम्यनगरी ते पुष्पमंगल कार्यालय), सहकारनगर रस्ता (गजानन महाराज मठ ते पंचमी हॉटेल), वानवडी (जगताप चौक ते जांभूळकर चौक), लुल्लानगर ते गंगाधाम चौक, हडपसर-महंमदवाडी रस्ता (रहेजा सर्कल ते विबग्योर स्कूल), सासवड रस्ता (गाडीतळ ते गोंधळेनगर), जंगली महाराज रस्ता, पाषाण-सूस रस्ता, मयूर कॉलनी, सिटी प्राइड थिएटर कोथरूड, कर्वे रस्ता (शेलारमामा चौक ते सावरकर स्मारक, पौड फाटा ते डहाणूकर कॉलनी), खराडी दक्षिण मुख्य रस्ता, ५०९ चौक ते विश्रांतवाडी आणि बॉम्बे सॅपर्स ते विश्रांतवाडी या रस्त्यांवर पादचारी दिन उपक्रम राबविला जाणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा