Radhakrishna Vikhe : विखे पिता-पुत्राने घेतली दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट, कारण आहे खास!



ब्युरो टीम : खासदार डॉ.सुजय विखे पाटील आणि राज्याचे महसूलमंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांना शिर्डी मतदारसंघात सुरु असलेल्या कामांची माहिती देऊन मार्च २०२३ मध्ये त्यासाठी येण्याचे निमंत्रण मोदी यांना दिले आहे. हे निमंत्रण स्वीकारून मोदी शिर्डीला आल्यास विखे पाटील यांचे नगरच्या भाजपमधील वजन वाढू शकेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच नागपूर दौरा झाला. यावेळी समृद्धी महामार्ग आणि मेट्रो आणि इतर अनेक कामांची उद्घाटने त्यांच्या हस्ते करण्यात आली. आता असाच कार्यक्रम शिर्डीत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मार्च २०२३ मध्ये नियोजित असलेल्या या कार्यक्रमासाठी खासदार डॉ.सुजय विखे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोदींची दिल्लीत भेट घेऊन निमंत्रण दिले. मोदींनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले. 

शिर्डी मतदारसंघात नेमका काय कार्यक्रम होणार?

शिर्डीच्या साईबाबा संस्थानतर्फे १०९ कोटी रुपयांच्या निधीतून विकसित करण्यात आलेले दर्शन रांगेचे १२ हॉल, २१८ कोटी रुपयांच्या निधीतून विकसित करण्यात आलेल्या एज्युकेशन कॉम्प्लेक्स उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. तसेच उत्तर नगर जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले निळवंडे धरण, शिर्डी विमानतळ येथील नवीन टर्मिनल बिल्डिंग आणि शिर्डीतील अंतर्गत रस्त्यांच्या लोकार्पणाचा कार्यक्रमही त्यावेळी करण्यात येणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मार्च २०२३ मध्ये हे कार्यक्रम ठेवण्याचे नियोजन आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने