ब्युरो टीम : पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये राज्य ऑलम्पिक स्पर्धेच उदघाटन कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या खुर्चीत अजित पवार बसलेले दिसून आले. अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचे बघून विविध चर्चांना उधाण आलं होतं.
नेमकं काय घडलं?
पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये आज राज्य ऑलम्पिक स्पर्धेच्या उदघाटन सोहळा पार पडला.या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान रंगमंचावर मान्यवरांसाठी त्यांच्या नावाचे लेबल लाऊन राखीव खूर्च्या ठेवण्यात आल्या होत्या दुपारी साडेचार वाजता उद्धाटन सोहळा पार पडणार होता. मात्र, कार्यक्रम वेळेत सुरु न झाल्यामुळे क्रीडा व युवक सेवाचे सुहास दिवसे यांना अजित पवार हे वारंवार घड्याळ दाखवून उदघाटनासाठी वेळ होत असल्याचं सुचवत होते. दरम्यान, स्वागत गीत झाल्यानंतर तातडीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या हस्ते कार्यक्रमचं उदघाटन करत मशाल पेटवून शुभारंभ केला. पुढील कार्यक्रमाला वेळ होत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निघून गेले. फडणवीस गेल्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शेजारी ठेवण्यात आलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर येऊन बसले. अजित पवारांसाठी राखीव ठेवण्यात आलेली खूर्ची रिकामीच होती.
अन फडणवीस पुन्हा आले
काही वेळानंतर अजित पवार भाषण करण्यासाठी उठले. तेवढ्यात बालेवाडी क्रीडा संकुलनातील दुसऱ्या एटीपी चॅम्पियनशिप पारितोषिक समारंभाला गेलेले फडणवीस परतले आणि आपल्या खुर्चीवर बसले. काही वेळासाठी का होईना मात्र, अजित पवारांना उपमुख्यमंत्र्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या खूर्चीवर बसलेलं पाहून अनेक चर्चांना उधाण आले आहे. या प्रकारची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा