ब्युरो टीम : अहमदनगर शहराचे नामांतर करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे करावे, अशी मागणी केली जात आहे. यावरून नगर जिल्ह्यात चांगलेच राजकारण तापले आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता यामध्ये एमआयएम पक्षाने सुद्धा उडी घेतली आहे. एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'लोकसत्ता ऑनलाईन'ने याबाबत वृत्त दिलंय.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, 'अरे तुम्ही नोकरी द्या, रोजगार द्या. आज भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ढासळत आहेत. आज पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. गॅस सिलिंडरच्या किमतीही वाढल्या आहेत. तुम्हाला फक्त नावांची काळजी लागली आहे. कामाची काळजी करायला हवी. निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांचं काय झालं. सरकार चालवण्यात अपयश येत असल्यामुळे हे मुद्दे बाहेर काढले जात आहेत, अशी प्रतिक्रिया असदुद्दीन ओवैसी यांनी दिली.
दरम्यान, अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा दिवसेंदिवस तापत आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवीनगर करण्याची मागणी पुढे आल्यानंतर त्याला खासदार सुजय विखे पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही विरोध केलाय. त्यामुळे विखे पिता पुत्रांचा धनगर समाजातर्फे निषेध करण्यात आला आहे. आगामी निवडणुकांमध्ये त्यांना धडा शिकविण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा