ब्युरो टीम नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भाजपा महाराष्ट्र या ट्विटर अकाऊंटवर एक व्यंगचित्र पोस्ट करण्यात आलं आहे. यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.
भाजपा महाराष्ट्राने एक व्यंगचित्र पोस्ट केलं आहे. या व्यंगचित्रात शरद पवार यांना ज्योतिषी दाखवण्यात आलं आहे.त्यांच्या नावाची पाटी 'बारामतीकर ज्योतिष' अशी दाखवण्यात आली आहे. २०२३ चं भविष्य सांगायला ते झाडाखाली बसले आहेत. शरद पवारांना व्यंगचित्रात ज्योतिषी दाखवण्यात आलं असून संजय राऊत यांना पोपटाच्या रूपात दाखवण्यात आलं आहे. तर उद्धव ठाकरे त्यांच्याकडे हात दाखवत विचारत आहेत की या वर्षात माझे टोमणे बॉम्ब चालतील का? नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पोस्ट करण्यात आलेलं हे व्यंगचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार हा महाराष्ट्रातला न भुतो न भविष्यती असा प्रयोग होता. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष कधी एकत्र येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. हा प्रयोग जसा अनपेक्षित होता तेवढंच किंवा कांकणभर जास्तच महाराष्ट्रात घडलेलं सत्तांतर होतं. शिवसेनेत बंड होईल इतका मोठा गट फुटून भाजपासोबत जाईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना भाजपवर टीकेची एकही संधी सोडली नव्हती. तसंच मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरही ते सातत्याने भाजपवर टीका करत आहेत. भाजपने याला टोमणे बॉम्ब असं नाव दिलं आहे. हाच संदर्भ घेत नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजपा महाराष्ट्र या ट्विटर अकाऊंटवर एक व्यंगचित्र पोस्ट करण्यात आलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा