BJP : नगरमध्ये भाजपची बैठक सुरू, सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार?

ब्युरो टीम : नाशिक पदवीधर निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज मुंबई येथील मातोश्रीवर जाऊन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तर, दुसरीकडे काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी निवडणुकीत शेवटच्या क्षणी अपक्ष अर्ज दाखल केलाय. तांबे यांना भाजप पाठिंबा देईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच नगरमध्ये आज भाजपच्या जिल्हा प्रतिनिधींची भाजप कार्यालयात बैठक सुरू झाली आहे. त्यामुळे या बैठकीत तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत निर्णय होतो का? याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

भाजपचे जिल्हा कार्यालयमध्ये आज तातडीची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीला खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, भाजपचे नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्यासह महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. भाजपच्या केंद्रीय पातळीवरून आलेल्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याने या बैठकीत सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतला जातोय का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने