Chandrasekhar Bawankule : अहो ऐकलं का? भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणतात, 'आणखी २० आमदार…'



ब्युरो टीम : 'राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारला आणखी सुमारे २० आमदारांचा पाठिंबा वाढेल,' असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केला. ते अकोल्यात आले असता माध्यमांशी बोलत होते. 'काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी १४ फेब्रुवारीला सरकार कोसळण्याचे केलेले वक्तव्य तथ्यहीन व हास्यास्पद आहे,' असा टोलाही त्यांनी लगावला.

'महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस आहे. आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्याकडे उमेदवार देखील नसतील. यापूर्वीच्या ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात त्यांचा पेनही चालत नव्हता,' अशी टीका बावनकुळे यांनी करून विरोधकांनी विरोधी पक्ष म्हणून योग्य पद्धतीने काम करावे, असा सल्ला देखील दिला. ते पुढे म्हणाले,'आम्ही दोन वेळा विधानसभेत १६४ चा आकडा पार केला. एकदा विश्वास प्रस्तावावेळी तर काँग्रेसचे १० आमदार गैरहजर होते. पुन्हा विश्वासमताची वेळ आल्यास शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने असलेल्या आमदारांची संख्या १८४ पर्यंत पोहोचेल.'

'महाविकास आघाडीतील ५० आमदार केव्हा गेले, हे कळले देखील नाही. आता १० आमदार केव्हा जातील, हेही समजणार नाही. महाविकास आघाडीतील आमदारांना हुकूमशाही पद्धतीने वागणूक देण्यात येते,' असेही बावनकुळे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने