'जी -२०' परिषदेच्या तयारीबाबत पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल जे. डब्ल्यू मेरियट येथे आढावा बैठक पार पडली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे आदी उपस्थित होते.
'जी -२०' परिषदेच्या निमित्तानं प्रतिनिधींच्या स्वागतासाठी तसेच शहर सौंदर्यीकरण आणि अनुषंगिक विकासकामांची तयारी अपेक्षेपेक्षा खूपच चांगली झाली आहे,’ अशा शब्दात पाटील यांनी प्रशासनाचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, ‘३७ देशातील १५० हून अधिक प्रतिनिधी या परिषदेसाठी येणार असल्याने सुरक्षाविषयक तसेच शिष्टाचारासंबंधी सर्व काळजी घ्यावी. पुणे, महाराष्ट्राची औद्योगिक क्षमता, गुंतवणुकीची क्षमता संपूर्ण क्षमतेने प्रदर्शित करावी, पुणे शहराची संस्कृती, येथील विकास दाखवण्याची चांगली संधी पुणे शहराला मिळाली असून शहरातील नागरिकांनी आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या स्वागतामध्ये सहभागी व्हावे,’ असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले.
याप्रसंगी विभागीय आयुक्त राव यांनी नियोजित कार्यक्रमांचे संगणकीय सादरीकरण केले. बैठकीसाठी भारत सरकारच्या निर्देशानुसार व समन्वयातून आवश्यक बाबींचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे महापालिकेच्यावतीने शहर सुशोभिकरणाचे काम कल्पकपणे करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
पाहुण्यांचे स्वागत, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, बैठकीनिमित्त देण्यात येणारी प्रतिकात्मक भेटवस्तू, स्मृतीचिन्हे, लावण्यात येणारे प्रदर्शन स्टॉल, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरुपाची भोजनव्यवस्था, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या निमित्तानं भरडधान्याचे वैशिष्टपूर्ण खाद्यपदार्थ आदींबाबत यावेळी माहिती देण्यात आली.
‘जी -२०' बैठक स्थळाशेजारी ५ प्रदर्शन दालने उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुणे महापालिकेकडून शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात सुरु असलेल्या कामांची माहिती असणारे दालन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळाचे महाराष्ट्र व पुण्याची औद्योगिक क्षमता प्रदर्शित करणारे दालन, भारतीय जनजातीय सहकारी विपनन विकास महासंघ (ट्रायफेड) आणि महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योगची उत्पादनांचा समावेश असलेले दालन तसेच महिला व बचत गटाची उत्पादने आणि सामाजिक वनीकरणांतर्गत बांबूपासून बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री दालन उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पुणे विद्यापीठात १६ जानेवारी रोजी या पाहुण्यांच्या सन्मानार्थ शाही मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुणेरी ढोल पथक, महाराष्ट्राचे मर्दानी खेळ, लावणी जुगलबंदी, शिववंदना, गणेशस्तुती तसेच गोंधळ आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा