ब्युरो टीम : 'जी -२०' परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात करण्यात आलेल्या विविध शहर सौंदर्यीकरण कामांची तसेच विकास कामांची पाहणी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे आदी उपस्थित होते.
पुणे विमानतळ येथे या पाहणीला प्रारंभ झाला. विमानतळ येथून 'जी -२०' परिषदेचे प्रतिनिधी जे. डब्ल्यू मेरियट हॉटेल या बैठक स्थळाकडे जाणाऱ्या मार्गाची संपूर्ण पाहणी यावेळी पालकमंत्री पाटील यांनी केली. पुणे विमानतळ येथे करण्यात आलेल्या सुशोभीकरणाची माहिती विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी दिली.
विमानतळापासूनच्या प्रतिनिधींच्या प्रवासमार्गावरील विमानतळ, येरवडा कारागृहाची सीमाभिंत, पुणे रेल्वे स्थानक तसेच अन्य शासकीय संस्था, खासगी इमारतींच्या सीमाभिंतीवर करण्यात आलेली कलात्मक रंगरंगोटी, रंगवण्यात आलेली चित्रे, पुणेरी पाट्या, पुण्याची वैशिष्ट्ये असलेल्या संकल्पनाधिष्ठीत रंगकामाची व सुशोभिकरणाची पाहणी पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केली. झालेल्या कामांची माहिती घेऊन आवश्यक त्या सुधारणांचेही निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
टिप्पणी पोस्ट करा