Jp Nadda In Maharashtra : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज महाराष्ट्रात, कारण आहे खास



ब्युरो टीम :  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आज, सोमवारी महाराष्ट्रात येणार आहेत. ते आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात  चंद्रपूर आणि औरंगाबाद येथे भेट देणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी हा दौरा महत्वाचा मानला जात असल्याने याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आगामी २०२४ची लोकसभा निवडणूक वर्षभरावर आहे. सलग तिसऱ्या विजयासाठी भाजपने नियोजनपूर्ण तयारी सुरू केली आहे. ‘मिशन १४४’च्या पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे लोकसभा मतदारसंघांत पार पडले आहेत. सातत्यपूर्ण नियोजनसाठी समित्या स्थापन केल्या आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात भाजपचे प्रमुख नेते या १४४ मतदारसंघांत दौरे करणार आहेत. त्याच अनुषंगाने जे. पी. नड्डा आज, सोमवारी विदर्भातील चंद्रपूर येथे येत  आहेत. नड्डा चार्टर्ड विमानाने आज सकाळी ११ वाजता चंद्रपूरच्या मोरवा विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते देवी महाकालीचे दर्शन घेतील. सिव्हिल लाइनच्या न्यू इंग्लिश मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली.

चंद्रपूरच्या दौऱ्यात जे. पी. नड्डा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर उपस्थित राहणार आहेत.

चंद्रपूर येथील सभा झाल्यानंतर नड्डा आज दुपारी वेरुळच्या घृष्णेश्वराचे दर्शन घेतील. त्यानंतर औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होईल. सायंकाळी भाजप पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक घेणार आहेत. दरम्यान, भाजपने राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यात चंद्रपूर, हिंगोली, बुलडाणा, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरुर या मतदारसंघांचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने