ब्युरो टीम : 'मराठी भाषिक युवकांनी विविध क्षेत्रात पुढे जावे, यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल,' असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, गोव्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री गोविंद गावडे, संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी आमदार रामदास फुटाणे, डॉ.पी.डी.पाटील, गिरीष गांधी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, 'केंद्र शासनाच्या सेवेत मराठी माणसाचे प्रमाण कमी आहे. मराठी टक्का वाढविण्यासाठी युवकांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र शासन स्तरावर असे प्रयत्न होत असताना युवकांनी इतर क्षेत्रातील संधींचाही विचार करावा. राज्यातील बहुतांशी विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय सेवेला प्राधान्य देतात, ते उद्योग-व्यवसायाकडे फारसे वळत नाहीत. चांगली संधी असताना मराठी तरुण राज्याबाहेर जायला तयार होत नाही. सर्व क्षेत्रात मराठी टक्का वाढवायचा असल्यास नव्या पिढीत धाडस निर्माण करावे लागेल. मराठी माणूस जगात पुढे जायचा असेल तर तशी मानसिकता निर्माण करण्याची गरज आहे,' असेही त्यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा