Marathi Sahitya Sammelan : मराठी भाषा इतरांना आनंद देणारी व्हावी, मंत्री मुनगंटीवार यांचे वक्तव्य


ब्युरो टीम : 'मन-बुद्धीला समृद्ध करणारी आणि हृदयात आनंद निर्माण करणारी मराठी भाषा इतरांना आनंद देणारी कशी होईल, याचे चिंतन करण्याची गरज आहे. जगातील बोलल्या जाणाऱ्या भाषेपैकी आपली भाषा दहाव्या क्रमांकावर आहे. मराठी ही ऐतिहसिक वारसा सांगणारी, अध्यात्म विचार आणि साहित्यिक वैभव असलेली भाषा आहे. आपण जगातील १९३ देशांपैकी सांस्कृतिक वारशात पहिल्या १० मध्ये आहोत. मराठीला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून चार दिवसाच्या चिंतनातून मराठी पुढे नेण्यासाठी विचार करावा,' असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, गोव्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री गोविंद गावडे, संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी आमदार रामदास फुटाणे, डॉ.पी.डी.पाटील, गिरीष गांधी आदी उपस्थित होते.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, 'संत वाङ्मायाने मराठी भाषेला समृद्धी दिली. पर्यावरणावर प्रेम करणारी, सृष्टीचे महत्व जाणणारी, परमेश्वरी चिंतनात रमणारी, कर्तव्यपूर्तीसाठी पराक्रमाची गाथा सांगणारी, उत्तम प्रपंच करण्याचा संदेश देणारी, इंग्रजांना स्वराज्याच्या घोषणेने घाम फोडणारी मराठी भाषा आहे. उत्तम व्यवहाराचा मंत्रही मराठीने दिला आहे. मराठीची ऊर्जा आणि शक्ती विश्वकल्याणासाठी उपयोगात यावी, असा सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न आहे. मराठी ज्ञानाची भाषा व्हावी, असा प्रयत्न आहे. जगात हजारो भाषा संपुष्टात आल्या आहेत. मराठी ज्ञान विज्ञान, शास्त्र, व्यापाराची भाषा व्हावी, यासाठी प्रयत्न करावे लागतील. जगातले उत्तम ज्ञान मराठी भाषेत आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘मराठी पोर्टल’ लवकरात लवकर तयार करण्याचा प्रयत्न आहे. मराठी सर्वांना श्रेष्ठ करणारी भाषा व्हावी, सर्वांना आनंद देणारी भाषा व्हावी, यासाठी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी ज्ञानेश्वर मुळे यांनी देखील विचार व्यक्त केले. तसेच मंत्रीद्वयांच्या हस्ते संमेलन आयोजनासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने