Nashik Graduates Constituency : ठरल! सत्यजीत तांबे विरुद्ध शुभांगी पाटील अशी थेट लढत

ब्युरो टीम : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीही रंजक घडामोडी पाहायला मिळाल्या. या निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या सत्यजीत तांबे यांच्या विजयासाठी भाजपने पडद्यामागून सूत्रे हलवले. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी असलेले गिरीश महाजन नाशिकमध्ये ठाण मांडून बसले होते. ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या शुंभागी पाटील यांनीही या निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते. अखेर तीन वाजेपर्यंत शुंभागी पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतलाच नाही. त्यामुळे आता या मतदारसंघात सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील विरुद्ध सुभाष जंगले अशी थेट लढत होणार आहे.

राज्यात होऊ घातलेल्या शिक्षक-पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकांमधील उमेदवारीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत होती. सकाळपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. विशेषतः नाशिक पदवीधरमध्ये कुणात लढत होणार, याबाबत अनेक चर्चा होत्या. आज भाजपचे समर्थक धनराज विसपुते आणि धनंजय जाधव यांनी माघार घेतली, पण शुभांगी पाटील या निवडणूक लढवण्यावर ठाम राहिल्या. त्यामुळे आता नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील विरुद्ध सुभाष जंगले अशी थेट लढत होणार आहे.

आज सकाळपासून शुभांगी पाटील नॉट रिचेबल होत्या. शुभांगी पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याची चर्चा होती. त्यामुळे शुभांगी पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील, अशीही अफवा पसरली होती. परंतु, ही शक्यता फोल ठरली. तर, दुसरीकडे आज नाशिक पदवीधर निवडणुकीत सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने